Thursday, September 3, 2020

भयंकराशी भेट

भयंकराशी भेट
दिनांक २४ ऑगस्ट २०२० च्या सकाळी मोबाईलची रिंग वाजली तेव्हा कल्पनाही नव्हती की ही एक भयप्रद घंटा आहे . माझ्या अगदी जवळच्या एका नातेवाईकाला भुसावळ हून जळगावला हॉस्पिटलमध्ये रातोरात ऍडमिट केलं होतं, आजाराचं निदान अजून झालं नव्हतं पण सगळी लक्षणं covid-19 ची होती, परिस्थिती चिंताजनक होती. वेळ जात होता तस-तशी पेशंट ची तब्येत गुंतागुंतीची होत गेली. रिपोर्ट अपेक्षेप्रमाणे पॉझिटिव आला. पेशंटच्या परिवारातील इतर काही सदस्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले, हे तर अधिकच काळजीत भर टाकणारं होतं. या कोरोनाच्या परिस्थितीत आपण किती हतबल होतो हे या वेळी प्रकर्षाने जाणवलं. पेशंटला भेटणं , त्याच्या अंगावरुन हात फिरवुन धीर देणं, घरातल्या इतर सदस्यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधणं हे सगळंच हिरावलं गेलं होतं . फक्त फोनवर संपर्क.  हा संपर्क अशा वेळी फार कोरडा आणि रुक्ष वाटतो. पेशंटच्या तब्येतीत सुधारणा नव्हतीच. मधुमेहाचा राक्षस विकट हास्य करीत होता. गणपतीचे दहा दिवस खरतर किती आनंददायी अन् चैतन्याने ओतप्रोत भरलेले असतात! पण या वर्षी त्याच काळात हे भयकारी संकट आमच्यावर चालून आलं. अशावेळी आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यास शिवाय आपल्याकडे काय असतं ?  "आलिया भोगासी असावे सादर" ! हां मात्र ईश्वराचे नामस्मरण आपल्याला बळ मिळवून देतं आणि त्याची कृपादृष्टी झाली तर परिस्थिती अनुकूल होत जाते. आमच्या बाबतीत तेच घडलं , 2 सप्टेंबरला पेशंटचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, बायपास व्हेंटिलेटर काढण्यात आलं, ऑक्सिजनची लेवलही समाधानकारक झाली. डॉक्टरी प्रयत्नाने आणि  ईश्वरी कृपेने अतिशय गुंतागुंतीची झालेली केस सुरळीत होत गेली.

 याच दरम्यान आमचे पारिवारिक मित्र असलेल्या डॉक्टर परिवारात एक दुर्दैवी घटना घडली. कोरोनाने एका नामांकित आणि सौजन्यमूर्ती असलेल्या डॉक्टरांचा घास घेतला. मन विषण्ण झालं त्या वेळची मनःस्थिती  शब्दात मांडण्या पलीकडची आहे.

 तिसरी घटनाही अलीकडचीच,  माझा निकटतम असलेल्या मित्राचे पितृछत्र कोरोनाने हिरावले आणि कुटुंबातील सात जणांना covid-19 ची लागण झाली. हॉस्पिटल, होम क्वारंटाईन, अत्यवस्थ पेशंटला पुण्याला हलवणं इत्यादी अत्यंत क्लेशदायक प्रकाराला माझ्या मित्राचा परिवार तोंड देत आहे.
 भुसावळातील माझ्या सराफी व्यवसायाशी संबंधित दोन उमदी व्यक्तिमत्व कोरोनाने संपवलीत. हे सर्व अत्यंत खिन्न करणार आहे.
हा लेख लिहिण्याचा माझा उद्देश हा भयंकराच्या प्रवास उलगडून भावनात्मक लेख लिहिणं असा अजिबात नाहीये तर या निमित्ताने मला काही सांगायचयं..... 

कोरोनाला दूर कसं ठेवायचं हे आपल्या कानीकपाळी गेल्या सहा महिन्यांपासून ओरडून सांगितल जातय त्यामुळे मी ते परत परत सांगणार नाहीये. आता कम्युनिटी ट्रान्सफर ची स्टेज येऊन ठेपली आहे. कोरोना कुटुंबाची कुटुंब ग्रासून टाकतो आहे.

 यानिमित्ताने मला आपल्या समाजाच्या  बेसावध मानसिकतेवर प्रकाश टाकायचाय. एक तर असलं काही भयंकर आपल्या वाट्याला येईलच कशाला ? अशा गाफील भूमिकेत आपण वावरत असतो किंवा येईल तेव्हा येईल पाहून घेऊ अशी वेडाचाराची भूमिका घेतो .फार तर जुजबी काळजी घेऊन आता यापलीकडे मी काही करू शकत नाही असं म्हणून सुटकेचा मार्ग शोधतो. आजच्या परिस्थितीची भयावहता ओळखून आपण आता अती सावधानतेची भूमिका घेणं आवश्यक आहे. कोणी याला घाबरटपणा म्हटलं तरी चालेल. पण सभोवताली जे दिसतय ते खरोखर एक दुःस्वप्न आहे. 

सावधगिरी बाळगायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर सर्व काळजी घेऊनही  जर *आपल्या घरात कोणाला थोडासा ताप किंवा सर्दी खोकला घसा खवखवणं,अशक्तपणा, अंगदुखी जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे धाव घ्या. ते सांगतील त्याप्रमाणे औषधोपचार आणि टेस्ट करून घ्या*. अशा वेळी वैद्यकीय व्यावसायिक कट प्रॅक्टिस करतात लुटतात वगैरे वगैरे विचार बाजूला ठेवा. प्रत्येक व्यवसायात चांगले वाईट लोक असतातच त्याचप्रमाणे या क्षेत्रात सुद्धा आहेत पण त्या नकारात्मक बाबींची चर्चा करून आपण डॉक्टर्स लोकांची चुकीची प्रतिमा  आपल्या मनात स्थापित करतो. मित्रांनो!! परिस्थिती आता आपल्याला फार वेळ देत नाहीये त्यामुळे *कुठलंच आजारपण अंगावर काढू नका* कोरोना ची लक्षण दिसल्यापासून लवकर उपचार घेणं म्हणजे कोरोना चा प्रसार थांबवण्यासारखचं आहे. लक्षणे दिसल्यापासून चार-पाच दिवसांचा अवधी हा  गोल्डन पिरेड  म्हणून संबोधला जातो. कारण  या कालावधीत लवकर उपचार घेतले तर परिस्थिती फारशी चिघळत नाही असं तज्ञ लोक सांगतात.
 तुमचा दिवसभरात अनेक लोकांशी संपर्क येत असेल तर विशेष काळजी घ्या. फेसशील्डचा वापर करा. आपले मित्र नातेवाईक अगदी रोजचे कामावरचे सहकारी यांच्यापासून विशिष्ट अंतर ठेवूनच संवाद साधा. कारण आपलेच तर आहेत यांच्यामुळे कुठे  काय होतंय ही मानसिकता घात करणारी आहे. अगदी आवश्यकता असेल तर आणि तरच घराबाहेर पडा. थोडे दिवस घरात थांबा मित्रांनो ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्यूटची लस येऊ घातलीए. दोन-तिन महिने आपल्याला संयम ठेवायचा आहे. ज्यांना रोज घराबाहेर पडावं लागतं त्यांनी घरी आल्यावर आवर्जून आंघोळ करणं ,गरम पाण्याच्या गुळण्या करणं, वाफ घेणं, नियमित व्यायाम, श्वासाचे व्यायाम करणं, सत्त्वयुक्त आहार घेणं, शक्य झाल्यास चवनप्राश किंवा विटामिन च्या गोळ्या डॉक्टरी सल्ल्याने घेणं चालू ठेवा.  मी तरुण आहे, माझी प्रतिकारशक्ती उत्तम आहे या भ्रमात राहू नका, कदाचित तुम्हाला काही होणारही नाही पण तुम्ही कोरोनाचे वाहक बनाल आणि आपल्या कुटुंबात कोरोनाला आमंत्रण द्याल. कोरोना कॅरियर्स मुळे कोरोनासुर   आपल्या कुटुंबात शिरतो. त्याला वेळीच रोखा. खरंतर आता संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची  वेळ आलीआहे. पण सरकार त्या मनस्थितीत नाहीये, म्हणून आपणच अखंड सावधान राहूया!  मी जो भयंकर अनुभव घेतला त्यातून धडा घेत माझ्या सुहृदांना सावधान करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे.

उज्ज्वल सुधाकर सराफ
   Gemmologist (रत्नतज्ज्ञ)
 भुसावळ

येथे क्लिक करुन आपण माझे इतर लेखही वाचू शकता

Tuesday, July 21, 2020

रत्नराज पुखराज



रत्नराज पुखराज
रामायण काल से ही श्रीलंका "सोने की लंका " नाम से जानी जाती है| चारो ओर से समुद्र व हरे भरे वनो से अच्छादित यह देश जैसे पन्ने का द्वीप है| एक गीत मे
 स्वर्ग से सुरम्य  लंका 
इसकी कीर्ती का सर्वत्र 
बजता रहता डंका....      ऐसा वर्णन हमे मिलता है| रत्नों के संदर्भ मे यह सत्य भी है |क्योंकि श्रीलंका के उदर मे अगणित रत्नभांडार छिपे हुए है| समस्त संसार के रत्न प्रेमी पुखराज की लालसा में  श्रीलंका आते रहते है| यहा रतनपुर नाम का छोटा सा शहर है |यहा हर खेत मे हमे रत्नो की खदाने देखने को मिलती है| जैसे पुखराज, नीलम, गार्नेट, स्पिनेल ऐसे तरह तरह के रत्न इन खदानो मे पर्याप्त मात्रा में देखने को मिलते है|
पुखराज की खदान याने एक प्रकार की चौकोन आकार की लकडी से जोडकर बांधी गई साधारतः छे फूट बाय छे फूट की चौडाई के  कुएं|  ऐसे कुओं मे यदी हम गये तो फिर हमे अत्यंत संकीर्ण ऐसे खोदे गये बोगदे दिखते है| उसकी मिट्टी टोपलीओंसे  बहार निकाली जाती है| कुओकें तल स्थित ये बोगदे प्राय: लंबे रहते है| पैरो के नीचे पानी ,अत्यंत सक्री जगह ऑक्सीजन की कमी और घना अंधेरा,  ऐसी परिस्थितियों में पुखराज की खोज की जाती है| इस पिली मिट्टी मे ही पुखराज हमे अपने अनगढ रूप में मिलता है| बाद में उसे तरशा जाता है|
बडे आकार मे पुखराज का मिलना दुर्लभ होता है| प्रायः अंडाकृती आकार में यह तराशा जाता है| ताकी रत्न का व्यर्थ अपव्यय ना हो |सामान्यतः अंडाकृती मे पुखराज की कटिंग की जाती है क्योंकि आयताकार ,चौकोनी आकार बनाते समय इसका अपव्यय जादा होता है| इसलिये चौकोनी व आयताकृती पुखराज महंगे रहते है| पुखराज की कीमत कैसे निर्धारित होती है?? यह एक महत्त्वपूर्ण मुद्दा है| उपर कहे मुताबिक पुखराज का आकार एवं वजन ये दो तत्व उसकी कीमत बढाने मे महत्त्वपूर्ण भूमिका रखते है|
 इसके अलावा रत्न की पारदर्शिता भी महत्वपूर्ण मानी जाती है |पुखराज जितना पारदर्शक उतना ही मूल्यवान काच की तरह स्वच्छ एवंम चमकीला तो अत्यंत दुर्लभ ही होता है| उसमे कोई बारीक चिन्ह रेखा या जिरंम होता है| जो उसके पेट मे रहती है |वास्तविक जिरम का विशिष्ट आकार 10गुने लेन्स के नीचे से देख करही इसकी परख होती है| फिर भी जिरम कम से कम होना एवम पीला रंग होना ये दो तत्व अपनी महत्त्वपूर्ण भूमिका पुखराज की किंमत तय करने मे अदा करते है| पिले रंग से पुखराजका निकट का नाता है| लेकिन हलदी की तरह पिला जर्द पुखराज मिलना दुर्लभ ही है| इसके अलावा हलकी हलकी पिली छटा  लिये व हलकी पिली झाई वाला पुखराज सहज ही उपलब्ध हो जाता है| इस पिले रंग की मांग के कारण पुखराज पर कई तरहकी ट्रीटमेंट की जाती है| थायलंड के कंचनाबुरी शहर मे ऐसी ग्लास फिलिंग एवंम थर्मल ट्रीटमेंट की गई रत्नोंका वैश्विक बाजार है|
कई देशों के बेपारी यहासे पुखराज की थोक मे खरीदी करते है| भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार ऐसी प्रक्रिया किये हुए रत्न बिलकुल ही उपयोग नही करना चाहिये |यहा के पुखराज बँकॉक सफायर के नाम से पहचाने जाते है |साधारण ब्रँडी जैसा पिला तंबाखू रंग इनका होता है| गहनो मे जडने के लिये जैसे नेकलेस, पेंडंटसेट मे बँकॉक सफायर चलन मे है| श्रीलंका के नैसर्गिक पुखराज की तुलना में येअत्यंत सस्ते होते है |परंतु ज्योतिषीय दृष्टीकोन से ये पुखराज उपयोग करताओंने लेना नही चाहिये|
पुखराज यह गुरु ग्रह का रत्न है|  गुरु को पीला रंग प्रिय होता है ,इसलिये पिलेपुखराज कि मांग जादा बनी रहती है| पुखराज मे सफेद, गुलाबी, केशरी, हरा ऐसे रंग भी मिलते है| पिले
 पुखराज की किंमत अपेक्षाकृत अधिक होती है| सफेद पुखराज को शुक्र के उपरत्न के रूप मे प्रयोग किया जाता रहा है |यदी वह नीले रंग का हो तो नीलम नाम से पहचाना जाता है | कोरंडम नाम का यह रत्न खजाने का एक परिवार है| इस्मे माणिक, नीलम , पुखराज ऐसे नवग्रह पारिवारके महत्वपूर्ण रत्न है |कुछ लोगो की यह धारणा हें की पुखराज का अंग्रेजी नाम Topaz है| सही मे ऐसा नही होकर yellow sapphire ये पुखराज का अंग्रेजी नाम है| पुखराज यह मूल्यवान रत्न होने से इसके डुप्लिकेट नकली पुखराज अधिक मात्रा मे उपलब्ध है| आकर्षक पीला रंग ,पारदर्शी, स्वच्छ ,चमकदार दीखने वाले ये नकली पुखराज कम किंमत मे उपलब्ध हो जाते है| कुछ लोग तो नकली प्रमाणपत्र सहित  ये झुटे रत्न बेचते है| और अंनजान ग्राहक बिना किसी तसदीक कीए यह रत्न खरीद लेते है |केवल गॅरंटी कार्ड है यह देखकर ही रत्न असली है ये समझना उचित नही है| ऐसी भ्रांती मनसे निकाल देनी चाहिये|

नवग्रह रत्नमालिका मे उत्तम मांग रखनेवाला गुरु ग्रह का यह  रत्न अत्यंत फलदायी समझा जाता है| इसलिये अगणित लोक अपनी तर्जनी मे पुखराज को स्वर्ण मे धारण करते है| एवंम नयी उम्मिदो के साथ यशस्वी शिखर की ओर अपने कदम बढाते है|

उज्ज्वल सुधाकर सराफ (भुसावल)
Gemmologist (रत्नतज्ज्ञ)
हिंदी अनुवाद-प्रा. डॉ. जगदीशप्रसाद सुचिक
प्राचार्य, संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय ,भुसावल

Friday, July 10, 2020

गुलमोहर

-


*गुलमोहर*

हे लॉकडाऊनचं लचांड काही केल्या संपायला तयार नाहीए. भुसावळात पुन्हा सात दिवसांचा लॉकडाऊन सुरू झालाय. लॉकडाउन एक,  लॉकडाउन 2....3....4..... हा आताचा पाचवा लॉक डाऊन.  मोबाईलचे जसे नवनवीन व्हर्जन लॉन्च होतात तसे हे लॉकडाऊन चे पण नवनवे प्रकार येत आहेत. या वेळेचा लॉकडाऊन जरा जास्तच सख्क्त आहे . म्हणजे पोलीस मुक्तपणे दंडुके चालवताहेत कोरोनामुळे तेही वैतागलेत .तो सगळा राग लोकांच्या पार्श्वभागावर निघतोय, त्यामुळे ब्रेकिंग न्यूज मिळतात पलीकडच्या गल्लीत गोल्डीला पोलिसांनी सुतला, बंटी ची बाईक जप्त! या असल्या लज्जतदार बातम्यांमुळे घराबाहेर अज्जिबात पडता येत नाहीये. मग खिडकीतून झाडं बघ,फुलं बघ,  पक्षी निरीक्षण कर असं चाललंय.

पहीला पाऊस पडला की घरासमोरचं मैदान हिरवंगार होतं.  मैदानाच्या कडेकडेने उभी असलेली झाडं अंगावरची धूळ झटकून " तेरी कमींज मेरी कमींज से हरी क्यू ? असं म्हणताना मी ऐकलंय. पाऊस पडायला लागला की सर्व सृष्टीने हिरव्या रंगात रंगवून घेतलं पाहिजे असा नियमच आहे. जणूकाही पावसाळ्यातला हा निसर्गाचा ड्रेसकोड आहे. तरीपण एखाद्या चुकार पाखराप्रमाणे घरासमोरचा हा गुलमोहर मात्र अजूनही चारही अंगानं फुलतोच आहे. हट्टी असावा तो! हिरव्यागार झाडांच्या रांगेत हा आपला लालबावटा घेऊन मोहकपणे उभा आहे. आपला पुष्पसंभार उतरवायला स्वारी काही तयार नाहीये. 

 वास्तविक पहिला पाऊस पडला की गुलमोहोर आपली फुलं उतरवून ठेवायला सुरुवात करतो . उन्हाळ्यात सगळी सृष्टी करपून गेलेली असताना गुलमोहर मात्र  चारही अंगांनी उन्मत्तपणे बहरत जातो . पूर्वी आमच्या घराभोवती गुलमोहराची खूप झाडं होती. माझ्या बालपणीची उन्हाळ्याची सुट्टी ही गुलमोहराच्या सोबतीनं बहरून जात असे. गुलमोहराच फुल हे पाच पाकळ्यांच. आपल्या तळहाता एवढ. वारा सुटला की त्याच्या टपोर्‍या कळ्या झाडाखाली गळून पडतात. त्या उचलून सोलायच्या, त्यातल्या चार पाकळ्या केशरी आणि एक लालजर्द... ती बाहेर काढायची... आतल्या बाजूने ती पांढरी शुभ्र आणि त्यावर लाल ठिपक्यांची पखरण तिला राजा म्हणतात .असा हा राजा अलगद तोंडात टाकायचा आंबटगोड अशी त्याची चव अजुनही माझ्या जिभेवर आहे. बाकीच्या पाकळ्या पण आंबटच पण राजाची बात न्यारी .अशी कित्येक फुलं मी लहानपणी हादडली आहेत. शिवाय साधारण एक इंच लांबीचे पराग बाहेर काढायचे त्यांच्या डोक्यावर जिऱ्याच्या दाण्यासारखी टोपी असते. ते घेऊन मग दोन मित्रांनी काटा-काटी खेळायची. रणरणतं ऊन असताना आई बाहेर जाऊ देत नसे तेव्हा गुलमोहराच्या सावलीतली उन्हाळ्याची सुट्टी अजूनही मनात रुंजी घालत असते.

गुलमोहर हे मूळचं मादागास्कर बेटावरचं झाड. दोनशे वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी ते भारतात आणलं इथल्या वातावरणात ते तगलं आणि भारतभर त्याचा प्रसार झाला.

 आता ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. हिरव्यागार झाडांच्या रांगेत आपली लाल मशाल पाजळीत उभ्या असलेल्या या हट्टी गुलमोहरा साठी सुरेश भटांची  'मनातल्या मनात मी' ही  गझल  त्यात किंचीतसा बदल करून लिहिली आहे.

असेच रोज नाहूनी
लपेट उन्ह कोवळे
       असेच चिंब अंग तू
        उन्हात सोड मोकळे
मनातल्या मनात मी
तुझ्या समीप राहतो
        तुला न सांगता तुझा
         वसंत रोज पाहतो....

*उज्ज्वल  सुधाकर सराफ* 
      Gemmologist(रत्नतज्ज्ञ)
       भुसावळ
येथे 👇क्लिक करा आणि हे लेख पण अवश्य वाचा

Thursday, June 4, 2020

डिस्कीटचं फुल




झाडांना वशीकरण विद्या अवगत असावी असा मला दाट संशय आहे. तुम्ही वारंवार झाडांच्या संपर्कात जात राहीलात तर झाडं तुमच्यावर प्रेमजाल फेकतात आणि मग हमखास तुम्ही त्यांच्या प्रेमात पडतातच पडतात.  काही मांत्रीकांना भानामती /काळीजादू करण्याची कला येते तशी झाडांना पण हिरव गारुड  करण्याची कला ठाऊक असते असा शोध मला लागला आहे. आणि एकदा का हे हिरव गारूड तुमच्या मेंदूत जाऊन बसलं की मग ते तुमचा पुरता ताबा घेतं आणि तुम्ही झाडं, पानं ,फुलं यातच गुंतत जातात .झाडांचा हिरवा रंग तुम्हाला वेडं करतो. खरंतर लहानपणी शाळेत असताना मला हिरवा रंग अजीबात आवडत  नसे, का? तर तो पाकिस्तानचा रंग आहे असा माझ्या मनाचा पक्का समज होता, त्यात पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा युनिफॉर्म हिरवाजर्द. त्यावेळी ५०षटकांचं वन डे क्रिकेट जोमात होतं आणि टीव्हीवर आकाशी युनिफॉर्म वाली आपली टीम विरुद्ध हिरव्या रंगाची दुश्मन की टीम असं युद्ध रंगायचं .त्यामुळे हिरवा रंग म्हणजे शत्रू पक्षाचा ! असंच शालेय जीवनात मला वाटत असे त्यामुळे की काय पूर्वी माझे वडीलही मला तू जरा हाफ मॅड आहेस असं म्हणत असत.  आता तर ते मला माझं फुलझाडांचं वेड पाहून गमतीने 'फुलवेडा' असं म्हणतात  आणि  माझ्या  बायकोला 'फुलवेडी'.

आपण रस्त्याने जात असलो की झाडं आपल्याला खुणावतात आणि म्हणतात ओळख मला?? बघ माझी पानं, फुलं ,उंची, खोडाचा रंग मग आपल्याला झाड ओळखण्याचा छंदच लागतो, आणि अवचितपणे एखादं खास आवडीचं झाड भेटलं की मग विचारूच नका दिवसभर आपला मूड जाम खुश असतो. असचं एकदा नासिक वणी मार्गावर वसंत ऋतूमध्ये प्रवास करत असताना मला रस्त्यात काटेसावर भेटली आहाहा!! विलक्षण सुंदर!!! आपला सगळा पर्णसंभार उतरून ती नखशिखांत लाल फुले ल्याली होती तिचं ते रक्तवर्णी रूप अनेक रूपगर्वितां पेक्षा कितीतरी मादक होतं आणि म्हणूनच का तिला सर्वांगावर काटे होते ?? माहित नाही .पण ती शाल्मली कायमची माझ्या मनात ठसली आहे.
.    काटेसावंर  👆

फुलझाडांचं वेड म्हणजे अक्षय आनंदाचं झुंबर. या फुलवेडातून काही नमुनेदार अनुभव आपल्या वाट्याला येतात त्या अनुभवां पैकीच हा एक अनुभव......
लडाख मधल्या लेह शहरा पासून उत्तरेकडे खरडूनग्ला पास हा जगातला सर्वात जास्त उंची वरून जाणारा हायवे आहे.(१८३८० फूट) ,अतिशय खडतर रस्ता,बर्फ़ाच्छादित शिखरं पार करून सियाचीन या जगातल्या सर्वोच्च युद्धभूमी कडे घेऊन जाणारा हाच तो हायवे. खरडूनग्ला पास पार केलं की तीव्र उताराची वळण घेत गाडी धाऊ लागते नुब्राव्हॅलीच्या दिशेने ,भोवतीचा निसर्ग पाहताना आपण परग्रहावर तर नाही ना आलो अस वाटावं इतका तो वेगळा वेगळा आहे. २०१६ च्या जून महिन्यात आम्ही लडाख ला गेलो होतो.नुब्रा व्हॅलीत डिस्कीट नावाचं छोट निम शहरी गाव आहे. लडाखी माणूस साधा सरळ,  अजून तरी काश्मिरी लोकांसारखा तो व्यवहारी झालेला नाही. डिस्कीट मधल्या रिअल सियाचीन या लॉजवर उतरलो.  तिथल्या छोट्याशा बागेत केशरी लिलीची सुंदर फुल फुलली होती, आपल्या भागात मी तरी कधी  लिलीचा असा केशरी शेड पाहिलेला नाही, लॉज च्या लडाखी मालकिणीला विनंती केली, तिने लिलीचा कंद काढून दिला, मग प्लास्टिक पिशवीत माती त्यात थोडं पाणी घालून आम्ही तो कंद डिस्कीट- लेह-कारगिल-श्रीनगर-मुंबई- भुसावळ असा सांभाळून आणला.घरच्या बागेत लावला, त्याला खतपाणी घालून वाढवला,डिस्कीटची आठवण म्हणून त्याच नाव ठेवलं "डिस्कीट"
डिसेंबरात घराच्या नूतनीकरणा च काम सुरु झालं,   गवंडी,प्लंबर,वायरमन,फेब्रिकेशनवाले,सुतार,पेंटर इ.इ.करागिरांचा एकच गोंधळ सुरु झाला. त्यात ते डिस्कीट तुडवल जात होत,आम्ही कामगारांना समजवत, ओरडत डिस्कीटला सांभाळत होतो. पण कसलं काय फेब्रुवारीत एक दिवस त्याचा पार चेंदामेंदा  झाला.डिस्कीट गेलं !
रोज सकाळी बागेत पाणी घालताना मी त्या जागेकडे हताशपणे बघायचो.त्या मोकळ्या जागेवर कधीतरी वेड्या आशेने पाणीही घालायचो.
आणि  चैत्रातल्या एका सकाळी " एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी" अस म्हणत डिस्कीट लिलीचे अंकुर लीलया जमिनीतून वर डोकावताना दिसले.झपाट्याने ते वाढत गेले. भोवताली वैशाख वणवा पेटलेला असताना लडाख सारख्या अतिशीत प्रांतातील ते झाड कळ्यांनी डवरलं, आणि जेष्ठातल्या कडकडीत उन्हात त्याला सुंदर सोनकेशरी फुल आलं!!!
सगळ्या संकटावर मात करत प्रतिकूलतेशी लढत,कणखरवृत्तीच्या पण अंतरात कोवळीक जपणाऱ्या लडाखी माणसाचं रूपच जणू, डिस्कीटचं फुल
 
डिस्कीटचं फुल👆

उज्ज्वल सराफ
       रत्नतज्ज्ञ(Gemmologist)
         
येथे क्लिक करा आणि हे पण अवश्य वाचा

Thursday, May 21, 2020

मदनबाण

                       





आमच्या बागेत मोगऱ्याचं एक छोटं झाड बऱ्याच वर्षांपासून आहे. त्याला उन्हाळ्यात अगदी मोजकी फुलं येतात. त्याच्याच शेजारी हजारी मोगर्‍याचं ही एक झाड आहे . नाव हजारी मोगरा आहे ,म्हणजे याला किमान पाचशे फुलं तरी येतील म्हणून मोठ्या आशेने लावला... पण एक फूल येईल तर शपथ !  नाव मोठ्ठम् लक्षण खोट्टंम्!   त्याच्याच बाजूला आहे वेली मोगरा,  त्याचा वेल ठीकठाक वाढला आहे . पण फुलं काही फारशी येत नाहीत त्याला. अलीकडे मला कळलं की याला वेली मोगरा म्हणत नाहीत, त्याचं खरं नाव आहे "मदनबाण"
 मात्र पानं अगदी मोगऱ्या सारखीच!

झाडांना भाव-भावना असतात म्हणे. मी त्यावेळी वेलीमोगऱ्यापाशी  म्हणजे मदनबाण पाशी गेलो त्याला म्हटलं मित्रा सॉरी !!  आम्ही उगीचच तुला वेली मोगरा म्हणायचो आज तुझं बारसं करुया तुझं नाव आजपासून मदनबाण ..कुsssरsss  .....              झालं !  बारसं झाल्याबरोबर स्वारी भलतीच खुश झाली. मग काय हीsss भरभरून फुल आमच्या मदनबाणला येऊ लागली. मी चाटच झालो .आमचे देवघर मदनबाण च्या फुलांनी भरून जाऊ लागले. दिवसभर देवघरात नुसता घमघमाट. देव पण खुश झालेएत आमचे.

मग माझ्या मनात विचार आला...
नुसतं बारसं केलं तर हा खूष होऊन एवढी फुलं देऊ लागला......
याचं लग्न करायचं म्हटलं तर काय बहार होईल......
स्वारी खुश होऊन रोज खंडीभर फुल देईल.....
तेव्हापासून माझ्या या सुगंधी मित्रासाठी मी स्थळ शोधतोय....
तुमच्या पाहण्यात कोणी आहे का चांगलं स्थळ?....
असेल तर सुचवा .....                  
मदनबाणाची थोडी फुलं तुम्हाला पण देईन म्हणतो.

उज्ज्वल सराफ(भुसावळ)
Gemmologist (रत्नतज्ज्ञ)

हे पण अवश्य वाचा.....








Thursday, May 7, 2020

सुवर्णमुद्रा विश्वासाची.... भाग २

सुवर्णमुद्रा विश्वासाची....भाग २





भुसावळ शहराच्या दोन जीवनदायीनी आहेत. एक म्हणजे बारा महीने खळाळत वाहणारी तापी माय . आणि दुसरी प्रवाशांना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवीणारी रेल्वे. या दोघींमुळे भुसावळ शहर वसलं आणि फुललं !  रेल्वेमुळे भुसावळात देशाच्या विविध प्रांतातले वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक वस्तीला आलेत आणि त्यांच्याबरोबर आली त्यांची संस्कृती,भाषा, आवडीनिवडी. त्यातूनच भुसावळची जडणघडण बहुरंगी शहर अशी झाली. त्याचा परिणाम इथल्या उद्योग व्यवसायांवर झाला. रेल्वे, दोन ऑर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र यामुळे भुसावळच्या बाजारपेठेत दर महिन्याला करोडोंची उलाढाल होत असते कितीही मंदी असली तरीही. कारण राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला होतोच होतो. भुसावळच्या सराफ बाजाराचा हा मोठा प्लस पॉइंट आहे.

भुसावळ शहर कॉस्मोपॉलिटीअन असल्यामुळे त्याचं प्रतिबिंब सराफांकडील दागिन्यांच्या डिझाईन मध्ये पाहायला मिळतं. ग्रामीण ग्राहकांची पसंती शुद्ध सोन्याच्या दागिन्यांना असते.  पूर्ण मोड मिळेल असे हे दागिने असतात. ह्यांच्या डीझाईन फारशा सौंदर्यपूर्ण नसतात.  पण इथे डिझाईन पेक्षा दागिन्यांच्या परताव्याचा विचार जास्त असतो. कारण शेतीचा हंगाम नाही आला तर हेच दागिने मोडता येतील अशी त्यामागची भूमिका असते. शहरी ग्राहक विशेषतः पुण्या-मुंबईशी संपर्क असणारे ग्राहक हे दागिन्यांच्या आकर्षकपणाला जास्त महत्त्व देतात. थोडीफार घट सहन करू पण हौस व्हायलाच हवी हा त्यामागचा दृष्टीकोन.

तुम्हाला गंमत वाटेल पण जाती धर्मावरूनही ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलतात असा माझा अनुभव आहे. वास्तविक मी जातीपातीच्या भिंती मानत नाही. अंती मानवाचे गोत्र एक !हा माझ्या मनीचा भाव आहे. पण जाती धर्मावरून सुद्धा दागिन्यांच्या डिझाइन्स ची आवड-निवड ठरते असं माझं निरीक्षण आहे.म्हणजे मुस्लिम ग्राहकांना कमी वजनात पण पसरट आणि  पत्रीव दागिने आवडतात. सिंधी ग्राहक लालसर रंगाच्या सोन्याला पसंती देतात. ब्राह्मण समाजातील ग्राहक मंगळसूत्र घेताना भरपूर काळे मणी असलेल्या डिझाइन्सला प्राधान्य देतात. याउलट लेवा पाटीदार समाजात सोनं जास्त दिसायला हवं असा आग्रह असतो. दाक्षिणात्य ग्राहकांना पोवळी मढवलेली डिझाईन्स आवडतात.तर गुजराती- राजस्थानी ग्राहक अमेरिकन डायमंड जडावलेल्या डिझाईन्स निवडवतात .बंगाली लोक मोत्यांच्या दागिन्यांवर प्रेम करतात. देशात अल्प प्रमाणात असणारे  पारशी ग्राहक हे हुशार व्यवहारी पण दिलदार वृत्तीचे असतात असा माझा अनुभव आहे.
 ग्राहकांच्या आपसातील बोलण्यातून रोज विविध भाषा कानावर पडत असतात. कोकणी भाषेत एक सुंदर नादमाधुर्य जाणवते. कोकणी बोली ऐकतच रहावी असे वाटते. ग्राहकांच्या बोलण्याची ढब,त्यांचा स्वर, बोलताना वापरत असलेले शब्द आणि हावभाव यावरून माणसाची प्राथमिक पारख करता येते. महिलांनी अंगावर घातलेल्या  दागिन्यांवरून त्यांना कोणत्या प्रकारच्या डिझाइन्स आवडतील, त्यांची सांपत्तिक स्थिती कशी आहे याचा अंदाज येतो. ग्राहकांच्या बाबतीतील ही सूक्ष्म निरीक्षणे ढोबळ आहेत पण यातूनच दुकानात आलेल्या अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करणं सोपं होतं
भारतीय विवाहांमधे सोन्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. जणूकाही विवाह आणि सोनं हे समानार्थी शब्द आहेत. ग्रामीण भागातून आजही लग्नाच्या सोने खरेदीसाठी बस्ते येतात. अर्थात पंधरा-वीस लोकांचा नातेवाईकांचा घोळका दुकानात येतो. नवरा-नवरी त्यांचे आई वडील काका मामा मावशी व्याही विहीणी असा मोठा गोतावळा असतो. असा बस्ता दुकानी आला की त्यांची खरेदी मी मस्त एन्जॉय करतो. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव वाचतो. त्यांची सोने खरेदीची उत्सुकता,डिझाईन्स बघतानाचे आनंदी चित्कार आपापसातले टोमणे, राग-लोभ रुसवे-फुगवे मजेशीर असतात .नवीन नवरा नवरी चे नवथर बुजरेपण मोठं लोभंस असतं.


दोन्ही पार्ट्यांमध्ये जास्त वजनाचे दागिने पसंत करावेत म्हणून चाललेली ओढाताण पाहण्याजोगी असते. काही वेळेस तर नवऱ्या मुलीने जड वजनाचे दागिने पसंत करायचे असं तीला घरूनच पढवून आणलेलं असतं. त्या बारीक चणीच्या मुलीला नाजूक दागिने आवडत असतात पण तिच्या शेजारी उभी असलेली तिची आई किंवा मावशी तीला कोपर टोचते  आणि जास्त वजनाचा दागिना पसंत कर म्हणून दटावते . तिकडे मुलाच्या आईचा जीव खालीवर होत असतो मध्येच कोणीतरी तिला अनाहूत सल्ला देतं, आहो तुमच्याच घरात येणार आहेत ते दागिणेsss घेऊ द्या तिच्या मनासारखं!! झालं एखादी सासू फणकार्‍याने हात झटकते. कधी कधी तर मोठा समर प्रसंग उभा राहतो .अगदी आता या मुद्द्यावरून यांचं लग्न मोडतं की काय असं मला वाटू लागतो. मग जुनेजाणते पुढे येतात समजूत घालतात.

१९६३ साली सुवर्ण नियंत्रण कायद्याच्या रूपाने सराफ व्यावसायिकांवर भयकारी संकट चालून आलं १९६६ पर्यंत त्याचा असर होता आणि पुढील बरीच वर्षे धंदा सावरायला लागलीत .२०१६ च्या फेब्रुवारीत केंद्र सरकारने सोन्यावर एक्साईज ड्युटी लावण्याची घोषणा केली आणि सराफ दुकानदारांचा देशव्यापी बंद सुरू झाला. तब्बल दीड महिना सराफ बाजार बंद राहिले. ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदीची घोषणा झाली आणि देशभरात मंदीची लाट उसळली. सर्व संकटातून सराफ व्यावसायिक सावरून उभे राहू शकले ते केवळ ग्राहकांच्या सदिच्छां मुळेच. सध्या सुरू असलेला कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर परीस्थिती अधिकच बिकट झालेली असणार  अस दिसतंय पण तरीही केवळ ग्राहकांच्या सहकार्यामुळे  आम्ही पुढची आव्हानही यशस्वीपणे पार करू याची मला खात्री आहे.

असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर |
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर |
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर |
असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर ||

उज्ज्वल सुधाकर सराफ
Gemmologist (रत्नतज्ज्ञ)

हे पण अवश्य वाचा
https://lihuanande.blogspot.com/2020/02/blog-post.html?m=1







Thursday, April 30, 2020

सुवर्णमुद्रा विश्वासाची....भाग- १

सुवर्णमुद्रा विश्वासाची....भाग-१


भुसावळात रेल्वे आली म्हणून माझे खापरपणजोबा नथ्थूशेठ सखाराम शेठ नवगाळे हे सन १८९० च्या सुमारास भुसावळात स्थायिक झाले. ते सावकारी करीत असत. शेतजमीन आणि सोन्याचांदीचे दागिने गहाण ठेवून कर्ज देणे हा त्यांचा व्यवसाय पुढच्या पिढ्यांनी परंपरेने स्वीकारला आणि तो सराफी पेढीत रूपांतरित झाला. या १२५ वर्षांच्या परंपरेत असंख्य अनुभवांची मांदियाळी माझ्या वडिलांकडे जमा आहे.

साधारण तीस चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट ! एक दिवस एक विधवा म्हातारी दुकानात आली आणि करूण चेहऱ्याने वडीलांना सांगू लागली काय करू शेठ, माझा मुलगा खूप दारू पितो, रोज माझ्याकडे पैसे मागतो, नाही दिले तर हिसकावून घेतो, हात उगारायलाही कमी करत नाही. थोडाफार पैसा आहे माझ्याकडे पण तोही मुलाच्या व्यसनात संपून जाईल. तिच्या व्यथेवर काय उपाय? पोस्टात पैसे ठेवले तर व्यसनी मुलगा पासबुक बघून पैसे मागतो. म्हातारीची चिंता अगदी खरी होती. यावर वडिलांनी एक अफलातून उपाय सांगितला. सोन्याच्या चार बांगड्या बनवुन घ्या! अहो पण पोरगा त्या दुसऱ्याच दिवशी हिसकावून घेईल ना! म्हातारी म्हणाली, वडिलांनी सांगितले की बांगड्या सोन्याच्याच करू त्यावर चांदीचा पत्रा लावून देतो. दिसायला त्या चांदीच्या दिसतील. म्हातारीला आयडीया एकदम पटली. तीस-चाळीस वर्षांपूर्वी चांदीची किंमत नगण्य होती. बरीच वर्षे ती म्हातारी हातात चार चांदीच्या बांगड्या घालून वावरली. दुकानात आली की बांगड्यां कडे बघून खुदुखुदु हसायची.

१९६३ साली पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते आणि मोरारजी देसाई अर्थमंत्री होते .तेव्हा सुवर्ण नियंत्रण कायदा लागू करण्यात आला. शुद्ध सोनं विकायला बंदी करण्यात आली. सोन्याच्या शुद्धतेसाठीच नावारूपाला आलेली आमची पेढी या अवचित संकटाने हादरून गेली. शुद्ध सोनं विकायचं नाही, १४कॅरेटच विकायचं, काहीतरी विपरीत ! मोठ्या विश्वासाने मध्यमवर्गीय आणि खेडूत लोक शुद्ध सोनं घेण्यासाठी माझ्याकडे येतात, त्यांना काय १४ कॅरेटच सोनं देऊ? अशक्य!! त्यापेक्षा मी दुकान बंद करून शेती करीन. आणि या तत्त्वासाठी वडीलांनी चक्क दोन वर्षे दुकानाला कुलूप लावलं ,नुकसान सहन केलं पण १४ कॅरेटचं लाल सोनं नाही विकलं. दोन वर्षांनी कायद्याची बंधने सैल झाली तेव्हा दुकानाचं कुलूप निघालं. ग्राहकवर्ग पुन्हा परतून विश्वासाने खरेदी करू लागला.


जेव्हा मी दुकानात प्रथमच सीसीटीव्ही कॅमेरे लावले तेव्हा एक ग्राहक मला म्हणाले चला बरं झालं या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आता चोरांना चांगला वचक बसेल. हे कॅमेरे चोरी पकडण्यासाठी लावले आहेत हे खरय, पण चोर त्यांना घाबरत नाहीत. मात्र एखाद्या माणसाला काउंटरवर आमच्या नजरचुकीने राहून गेलेली वस्तू उचलण्याचा मोह झाला तर अशा प्रोफेशनल चोर नसणाऱ्या पण मोहवशात  चोरी करणाऱ्या लोकांवर मानसिक दबाव ठेवण्याचं काम तो कॅमेरा उत्तमपणे करतो . सराफी दुकानांमध्ये काऊंटर वरून वस्तू जाण्याचे प्रकार कधीकधी होतातच. आम्ही लोक अखंड सावधान असतो विशेषतः बुरखे वाल्या बायां पासून फार सावधानता बाळगावी लागते. मागे एका सराफ असोसिएशनने तर दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी बुरखे काढावेत असा प्रस्ताव ठेवला होता पण धार्मिक भावना दुखावतील म्हणून तो मागे घ्यावा लागला.

ग्राहकांकडून दागिन्यांची मोड घेणं हा तसा माझा मन खंतावणारा प्रकार आहे. अगदी नव्वद टक्के ग्राहक सोन्याच्या दागिन्यांची मोड करतो तेव्हा त्याच्याकडे आर्थिक अडचण असते .आजारपण असतं. कर्जाचे हप्ते थकले असतात. शेतकरी असेल तर शेती हा  आतबट्याचा व्यवसाय झाल्याने तो बिचारा त्रस्त झालेला असतो. ग्राहकाला पैशाची खूप निकड असते आणि घाई पण असते. अशावेळी कायदा आडवा येतो. नवीन कायद्याप्रमाणे दहा हजार रुपयांच्या वरची मोड घेताना रोख रक्कम देता येत नाही, चेक द्यावा लागतो. अशा वेळी आम्ही कात्रीत सापडतो .ग्राहक रोख रकमेसाठी अजीजी करतो आणि कायदा आमचे हात बांधतो.

विधवा स्त्रीच्या मंगळसूत्राची मोड घेणं हा तर अत्यंत वेदनादायी अनुभव असतो. मंगळसूत्र हा  स्त्रियांसाठी केवळ एक दागिना नाही तर त्याहूनही खूप अधिक जिवाभावाची वस्तू असते. मंगळसूत्र मोडीला देताना त्या विधवा स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जातात. मध्यंतरी माझ्याशी जवळून परिचय असणाऱ्या एका मध्यमवयीन ग्राहकाचंअकाली निधन झालं .त्यांच्या पत्नीने मंगळसूत्र मोडून आता चेन द्या, असं म्हटलं तेव्हा तर मी शहारून गेलो . त्या मंगळसूत्राचे काळे मणी फोडण्यासाठी हातोडीचे घाव घातले जात होते जणू काही ते माझ्या हृदयावरच होत होते.

जळगाव -भुसावळचा सराफी कट्टा हा उत्तम दर्जाच्या सोन्यासाठी विख्यात आहे. त्यासाठी अगदी दूरदूरवरून ग्राहक सोने खरेदीसाठी येतात. भुसावळात काही वर्ष राहून नंतर दुसऱ्या गावी गेलेले असंख्य ग्राहक असे आहेत की जे आवर्जून सोनं खरेदीसाठी आमच्या पेढीत येतात. वृद्धत्वामुळे हिंडायला फिरायला त्रास होत असतो  ,तरीदेखील दूरवरचा प्रवास करून जेव्हा ग्राहक मोठ्या विश्वासाने दुकानात येतात तेव्हा अगदी भरून येतं आणि "पैसा कमवीण्यापेक्षा विश्वास कमवीणं जास्त महत्त्वाचे आहे " ही वडीलांची शिकवण अधोरेखित होते ,म्हणूनच विश्‍वासाची सुवर्णमुद्रा ग्राहकांच्या मनावर कोरणं हे जास्त महत्त्वाचे आहे असं मला वाटतं.
(क्रमशः)



उज्ज्वल सुधाकर सराफ
Gemmologist (रत्नतज्ज्ञ)

हे देखील अवश्य वाचा







भयंकराशी भेट

भयंकराशी भेट दिनांक २४ ऑगस्ट २०२० च्या सकाळी मोबाईलची रिंग वाजली तेव्हा कल्पनाही नव्हती की ही एक भयप्रद घंटा आहे . माझ्या अगदी ज...