*गुलमोहर*
हे लॉकडाऊनचं लचांड काही केल्या संपायला तयार नाहीए. भुसावळात पुन्हा सात दिवसांचा लॉकडाऊन सुरू झालाय. लॉकडाउन एक, लॉकडाउन 2....3....4..... हा आताचा पाचवा लॉक डाऊन. मोबाईलचे जसे नवनवीन व्हर्जन लॉन्च होतात तसे हे लॉकडाऊन चे पण नवनवे प्रकार येत आहेत. या वेळेचा लॉकडाऊन जरा जास्तच सख्क्त आहे . म्हणजे पोलीस मुक्तपणे दंडुके चालवताहेत कोरोनामुळे तेही वैतागलेत .तो सगळा राग लोकांच्या पार्श्वभागावर निघतोय, त्यामुळे ब्रेकिंग न्यूज मिळतात पलीकडच्या गल्लीत गोल्डीला पोलिसांनी सुतला, बंटी ची बाईक जप्त! या असल्या लज्जतदार बातम्यांमुळे घराबाहेर अज्जिबात पडता येत नाहीये. मग खिडकीतून झाडं बघ,फुलं बघ, पक्षी निरीक्षण कर असं चाललंय.
पहीला पाऊस पडला की घरासमोरचं मैदान हिरवंगार होतं. मैदानाच्या कडेकडेने उभी असलेली झाडं अंगावरची धूळ झटकून " तेरी कमींज मेरी कमींज से हरी क्यू ? असं म्हणताना मी ऐकलंय. पाऊस पडायला लागला की सर्व सृष्टीने हिरव्या रंगात रंगवून घेतलं पाहिजे असा नियमच आहे. जणूकाही पावसाळ्यातला हा निसर्गाचा ड्रेसकोड आहे. तरीपण एखाद्या चुकार पाखराप्रमाणे घरासमोरचा हा गुलमोहर मात्र अजूनही चारही अंगानं फुलतोच आहे. हट्टी असावा तो! हिरव्यागार झाडांच्या रांगेत हा आपला लालबावटा घेऊन मोहकपणे उभा आहे. आपला पुष्पसंभार उतरवायला स्वारी काही तयार नाहीये.
वास्तविक पहिला पाऊस पडला की गुलमोहोर आपली फुलं उतरवून ठेवायला सुरुवात करतो . उन्हाळ्यात सगळी सृष्टी करपून गेलेली असताना गुलमोहर मात्र चारही अंगांनी उन्मत्तपणे बहरत जातो . पूर्वी आमच्या घराभोवती गुलमोहराची खूप झाडं होती. माझ्या बालपणीची उन्हाळ्याची सुट्टी ही गुलमोहराच्या सोबतीनं बहरून जात असे. गुलमोहराच फुल हे पाच पाकळ्यांच. आपल्या तळहाता एवढ. वारा सुटला की त्याच्या टपोर्या कळ्या झाडाखाली गळून पडतात. त्या उचलून सोलायच्या, त्यातल्या चार पाकळ्या केशरी आणि एक लालजर्द... ती बाहेर काढायची... आतल्या बाजूने ती पांढरी शुभ्र आणि त्यावर लाल ठिपक्यांची पखरण तिला राजा म्हणतात .असा हा राजा अलगद तोंडात टाकायचा आंबटगोड अशी त्याची चव अजुनही माझ्या जिभेवर आहे. बाकीच्या पाकळ्या पण आंबटच पण राजाची बात न्यारी .अशी कित्येक फुलं मी लहानपणी हादडली आहेत. शिवाय साधारण एक इंच लांबीचे पराग बाहेर काढायचे त्यांच्या डोक्यावर जिऱ्याच्या दाण्यासारखी टोपी असते. ते घेऊन मग दोन मित्रांनी काटा-काटी खेळायची. रणरणतं ऊन असताना आई बाहेर जाऊ देत नसे तेव्हा गुलमोहराच्या सावलीतली उन्हाळ्याची सुट्टी अजूनही मनात रुंजी घालत असते.
गुलमोहर हे मूळचं मादागास्कर बेटावरचं झाड. दोनशे वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी ते भारतात आणलं इथल्या वातावरणात ते तगलं आणि भारतभर त्याचा प्रसार झाला.
आता ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. हिरव्यागार झाडांच्या रांगेत आपली लाल मशाल पाजळीत उभ्या असलेल्या या हट्टी गुलमोहरा साठी सुरेश भटांची 'मनातल्या मनात मी' ही गझल त्यात किंचीतसा बदल करून लिहिली आहे.
असेच रोज नाहूनी
लपेट उन्ह कोवळे
असेच चिंब अंग तू
उन्हात सोड मोकळे
मनातल्या मनात मी
तुझ्या समीप राहतो
तुला न सांगता तुझा
वसंत रोज पाहतो....
*उज्ज्वल सुधाकर सराफ*
Gemmologist(रत्नतज्ज्ञ)
भुसावळ
येथे 👇क्लिक करा आणि हे लेख पण अवश्य वाचा
अप्रतिम लेख.एकतर आपल्याकडे गुलमोहर कसा व कुठून आला याबद्दल खुलासा झाला आणि गुलमोहर च्या सुंदर केशरी फुलांच्या सान्निध्यात घालविलेले बालपण आठवले.अनायासे आजच केरळ राज्यातील एका रेलवे स्टेशन चा फोटो वॉट्सएप्प वर पाठवत आहे त्यात गुलमोहर च्या फुलांचा सडा पडलेला प्लेटफॉर्म आणि रेलवे ट्रैक तुम्हाला नक्कीच खूप आनंद देईल.
ReplyDeleteअनिल वांबोरीकर.
धन्यवाद काका
ReplyDeleteतुम्ही पाठवलेले फोटो अप्रतिम!!!