Thursday, May 21, 2020

मदनबाण

                       





आमच्या बागेत मोगऱ्याचं एक छोटं झाड बऱ्याच वर्षांपासून आहे. त्याला उन्हाळ्यात अगदी मोजकी फुलं येतात. त्याच्याच शेजारी हजारी मोगर्‍याचं ही एक झाड आहे . नाव हजारी मोगरा आहे ,म्हणजे याला किमान पाचशे फुलं तरी येतील म्हणून मोठ्या आशेने लावला... पण एक फूल येईल तर शपथ !  नाव मोठ्ठम् लक्षण खोट्टंम्!   त्याच्याच बाजूला आहे वेली मोगरा,  त्याचा वेल ठीकठाक वाढला आहे . पण फुलं काही फारशी येत नाहीत त्याला. अलीकडे मला कळलं की याला वेली मोगरा म्हणत नाहीत, त्याचं खरं नाव आहे "मदनबाण"
 मात्र पानं अगदी मोगऱ्या सारखीच!

झाडांना भाव-भावना असतात म्हणे. मी त्यावेळी वेलीमोगऱ्यापाशी  म्हणजे मदनबाण पाशी गेलो त्याला म्हटलं मित्रा सॉरी !!  आम्ही उगीचच तुला वेली मोगरा म्हणायचो आज तुझं बारसं करुया तुझं नाव आजपासून मदनबाण ..कुsssरsss  .....              झालं !  बारसं झाल्याबरोबर स्वारी भलतीच खुश झाली. मग काय हीsss भरभरून फुल आमच्या मदनबाणला येऊ लागली. मी चाटच झालो .आमचे देवघर मदनबाण च्या फुलांनी भरून जाऊ लागले. दिवसभर देवघरात नुसता घमघमाट. देव पण खुश झालेएत आमचे.

मग माझ्या मनात विचार आला...
नुसतं बारसं केलं तर हा खूष होऊन एवढी फुलं देऊ लागला......
याचं लग्न करायचं म्हटलं तर काय बहार होईल......
स्वारी खुश होऊन रोज खंडीभर फुल देईल.....
तेव्हापासून माझ्या या सुगंधी मित्रासाठी मी स्थळ शोधतोय....
तुमच्या पाहण्यात कोणी आहे का चांगलं स्थळ?....
असेल तर सुचवा .....                  
मदनबाणाची थोडी फुलं तुम्हाला पण देईन म्हणतो.

उज्ज्वल सराफ(भुसावळ)
Gemmologist (रत्नतज्ज्ञ)

हे पण अवश्य वाचा.....








Thursday, May 7, 2020

सुवर्णमुद्रा विश्वासाची.... भाग २

सुवर्णमुद्रा विश्वासाची....भाग २





भुसावळ शहराच्या दोन जीवनदायीनी आहेत. एक म्हणजे बारा महीने खळाळत वाहणारी तापी माय . आणि दुसरी प्रवाशांना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवीणारी रेल्वे. या दोघींमुळे भुसावळ शहर वसलं आणि फुललं !  रेल्वेमुळे भुसावळात देशाच्या विविध प्रांतातले वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक वस्तीला आलेत आणि त्यांच्याबरोबर आली त्यांची संस्कृती,भाषा, आवडीनिवडी. त्यातूनच भुसावळची जडणघडण बहुरंगी शहर अशी झाली. त्याचा परिणाम इथल्या उद्योग व्यवसायांवर झाला. रेल्वे, दोन ऑर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र यामुळे भुसावळच्या बाजारपेठेत दर महिन्याला करोडोंची उलाढाल होत असते कितीही मंदी असली तरीही. कारण राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला होतोच होतो. भुसावळच्या सराफ बाजाराचा हा मोठा प्लस पॉइंट आहे.

भुसावळ शहर कॉस्मोपॉलिटीअन असल्यामुळे त्याचं प्रतिबिंब सराफांकडील दागिन्यांच्या डिझाईन मध्ये पाहायला मिळतं. ग्रामीण ग्राहकांची पसंती शुद्ध सोन्याच्या दागिन्यांना असते.  पूर्ण मोड मिळेल असे हे दागिने असतात. ह्यांच्या डीझाईन फारशा सौंदर्यपूर्ण नसतात.  पण इथे डिझाईन पेक्षा दागिन्यांच्या परताव्याचा विचार जास्त असतो. कारण शेतीचा हंगाम नाही आला तर हेच दागिने मोडता येतील अशी त्यामागची भूमिका असते. शहरी ग्राहक विशेषतः पुण्या-मुंबईशी संपर्क असणारे ग्राहक हे दागिन्यांच्या आकर्षकपणाला जास्त महत्त्व देतात. थोडीफार घट सहन करू पण हौस व्हायलाच हवी हा त्यामागचा दृष्टीकोन.

तुम्हाला गंमत वाटेल पण जाती धर्मावरूनही ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलतात असा माझा अनुभव आहे. वास्तविक मी जातीपातीच्या भिंती मानत नाही. अंती मानवाचे गोत्र एक !हा माझ्या मनीचा भाव आहे. पण जाती धर्मावरून सुद्धा दागिन्यांच्या डिझाइन्स ची आवड-निवड ठरते असं माझं निरीक्षण आहे.म्हणजे मुस्लिम ग्राहकांना कमी वजनात पण पसरट आणि  पत्रीव दागिने आवडतात. सिंधी ग्राहक लालसर रंगाच्या सोन्याला पसंती देतात. ब्राह्मण समाजातील ग्राहक मंगळसूत्र घेताना भरपूर काळे मणी असलेल्या डिझाइन्सला प्राधान्य देतात. याउलट लेवा पाटीदार समाजात सोनं जास्त दिसायला हवं असा आग्रह असतो. दाक्षिणात्य ग्राहकांना पोवळी मढवलेली डिझाईन्स आवडतात.तर गुजराती- राजस्थानी ग्राहक अमेरिकन डायमंड जडावलेल्या डिझाईन्स निवडवतात .बंगाली लोक मोत्यांच्या दागिन्यांवर प्रेम करतात. देशात अल्प प्रमाणात असणारे  पारशी ग्राहक हे हुशार व्यवहारी पण दिलदार वृत्तीचे असतात असा माझा अनुभव आहे.
 ग्राहकांच्या आपसातील बोलण्यातून रोज विविध भाषा कानावर पडत असतात. कोकणी भाषेत एक सुंदर नादमाधुर्य जाणवते. कोकणी बोली ऐकतच रहावी असे वाटते. ग्राहकांच्या बोलण्याची ढब,त्यांचा स्वर, बोलताना वापरत असलेले शब्द आणि हावभाव यावरून माणसाची प्राथमिक पारख करता येते. महिलांनी अंगावर घातलेल्या  दागिन्यांवरून त्यांना कोणत्या प्रकारच्या डिझाइन्स आवडतील, त्यांची सांपत्तिक स्थिती कशी आहे याचा अंदाज येतो. ग्राहकांच्या बाबतीतील ही सूक्ष्म निरीक्षणे ढोबळ आहेत पण यातूनच दुकानात आलेल्या अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करणं सोपं होतं
भारतीय विवाहांमधे सोन्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. जणूकाही विवाह आणि सोनं हे समानार्थी शब्द आहेत. ग्रामीण भागातून आजही लग्नाच्या सोने खरेदीसाठी बस्ते येतात. अर्थात पंधरा-वीस लोकांचा नातेवाईकांचा घोळका दुकानात येतो. नवरा-नवरी त्यांचे आई वडील काका मामा मावशी व्याही विहीणी असा मोठा गोतावळा असतो. असा बस्ता दुकानी आला की त्यांची खरेदी मी मस्त एन्जॉय करतो. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव वाचतो. त्यांची सोने खरेदीची उत्सुकता,डिझाईन्स बघतानाचे आनंदी चित्कार आपापसातले टोमणे, राग-लोभ रुसवे-फुगवे मजेशीर असतात .नवीन नवरा नवरी चे नवथर बुजरेपण मोठं लोभंस असतं.


दोन्ही पार्ट्यांमध्ये जास्त वजनाचे दागिने पसंत करावेत म्हणून चाललेली ओढाताण पाहण्याजोगी असते. काही वेळेस तर नवऱ्या मुलीने जड वजनाचे दागिने पसंत करायचे असं तीला घरूनच पढवून आणलेलं असतं. त्या बारीक चणीच्या मुलीला नाजूक दागिने आवडत असतात पण तिच्या शेजारी उभी असलेली तिची आई किंवा मावशी तीला कोपर टोचते  आणि जास्त वजनाचा दागिना पसंत कर म्हणून दटावते . तिकडे मुलाच्या आईचा जीव खालीवर होत असतो मध्येच कोणीतरी तिला अनाहूत सल्ला देतं, आहो तुमच्याच घरात येणार आहेत ते दागिणेsss घेऊ द्या तिच्या मनासारखं!! झालं एखादी सासू फणकार्‍याने हात झटकते. कधी कधी तर मोठा समर प्रसंग उभा राहतो .अगदी आता या मुद्द्यावरून यांचं लग्न मोडतं की काय असं मला वाटू लागतो. मग जुनेजाणते पुढे येतात समजूत घालतात.

१९६३ साली सुवर्ण नियंत्रण कायद्याच्या रूपाने सराफ व्यावसायिकांवर भयकारी संकट चालून आलं १९६६ पर्यंत त्याचा असर होता आणि पुढील बरीच वर्षे धंदा सावरायला लागलीत .२०१६ च्या फेब्रुवारीत केंद्र सरकारने सोन्यावर एक्साईज ड्युटी लावण्याची घोषणा केली आणि सराफ दुकानदारांचा देशव्यापी बंद सुरू झाला. तब्बल दीड महिना सराफ बाजार बंद राहिले. ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदीची घोषणा झाली आणि देशभरात मंदीची लाट उसळली. सर्व संकटातून सराफ व्यावसायिक सावरून उभे राहू शकले ते केवळ ग्राहकांच्या सदिच्छां मुळेच. सध्या सुरू असलेला कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर परीस्थिती अधिकच बिकट झालेली असणार  अस दिसतंय पण तरीही केवळ ग्राहकांच्या सहकार्यामुळे  आम्ही पुढची आव्हानही यशस्वीपणे पार करू याची मला खात्री आहे.

असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर |
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर |
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर |
असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर ||

उज्ज्वल सुधाकर सराफ
Gemmologist (रत्नतज्ज्ञ)

हे पण अवश्य वाचा
https://lihuanande.blogspot.com/2020/02/blog-post.html?m=1







भयंकराशी भेट

भयंकराशी भेट दिनांक २४ ऑगस्ट २०२० च्या सकाळी मोबाईलची रिंग वाजली तेव्हा कल्पनाही नव्हती की ही एक भयप्रद घंटा आहे . माझ्या अगदी ज...