भयंकराशी भेट
दिनांक २४ ऑगस्ट २०२० च्या सकाळी मोबाईलची रिंग वाजली तेव्हा कल्पनाही नव्हती की ही एक भयप्रद घंटा आहे . माझ्या अगदी जवळच्या एका नातेवाईकाला भुसावळ हून जळगावला हॉस्पिटलमध्ये रातोरात ऍडमिट केलं होतं, आजाराचं निदान अजून झालं नव्हतं पण सगळी लक्षणं covid-19 ची होती, परिस्थिती चिंताजनक होती. वेळ जात होता तस-तशी पेशंट ची तब्येत गुंतागुंतीची होत गेली. रिपोर्ट अपेक्षेप्रमाणे पॉझिटिव आला. पेशंटच्या परिवारातील इतर काही सदस्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले, हे तर अधिकच काळजीत भर टाकणारं होतं. या कोरोनाच्या परिस्थितीत आपण किती हतबल होतो हे या वेळी प्रकर्षाने जाणवलं. पेशंटला भेटणं , त्याच्या अंगावरुन हात फिरवुन धीर देणं, घरातल्या इतर सदस्यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधणं हे सगळंच हिरावलं गेलं होतं . फक्त फोनवर संपर्क. हा संपर्क अशा वेळी फार कोरडा आणि रुक्ष वाटतो. पेशंटच्या तब्येतीत सुधारणा नव्हतीच. मधुमेहाचा राक्षस विकट हास्य करीत होता. गणपतीचे दहा दिवस खरतर किती आनंददायी अन् चैतन्याने ओतप्रोत भरलेले असतात! पण या वर्षी त्याच काळात हे भयकारी संकट आमच्यावर चालून आलं. अशावेळी आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यास शिवाय आपल्याकडे काय असतं ? "आलिया भोगासी असावे सादर" ! हां मात्र ईश्वराचे नामस्मरण आपल्याला बळ मिळवून देतं आणि त्याची कृपादृष्टी झाली तर परिस्थिती अनुकूल होत जाते. आमच्या बाबतीत तेच घडलं , 2 सप्टेंबरला पेशंटचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, बायपास व्हेंटिलेटर काढण्यात आलं, ऑक्सिजनची लेवलही समाधानकारक झाली. डॉक्टरी प्रयत्नाने आणि ईश्वरी कृपेने अतिशय गुंतागुंतीची झालेली केस सुरळीत होत गेली.
याच दरम्यान आमचे पारिवारिक मित्र असलेल्या डॉक्टर परिवारात एक दुर्दैवी घटना घडली. कोरोनाने एका नामांकित आणि सौजन्यमूर्ती असलेल्या डॉक्टरांचा घास घेतला. मन विषण्ण झालं त्या वेळची मनःस्थिती शब्दात मांडण्या पलीकडची आहे.
तिसरी घटनाही अलीकडचीच, माझा निकटतम असलेल्या मित्राचे पितृछत्र कोरोनाने हिरावले आणि कुटुंबातील सात जणांना covid-19 ची लागण झाली. हॉस्पिटल, होम क्वारंटाईन, अत्यवस्थ पेशंटला पुण्याला हलवणं इत्यादी अत्यंत क्लेशदायक प्रकाराला माझ्या मित्राचा परिवार तोंड देत आहे.
भुसावळातील माझ्या सराफी व्यवसायाशी संबंधित दोन उमदी व्यक्तिमत्व कोरोनाने संपवलीत. हे सर्व अत्यंत खिन्न करणार आहे.
हा लेख लिहिण्याचा माझा उद्देश हा भयंकराच्या प्रवास उलगडून भावनात्मक लेख लिहिणं असा अजिबात नाहीये तर या निमित्ताने मला काही सांगायचयं.....
कोरोनाला दूर कसं ठेवायचं हे आपल्या कानीकपाळी गेल्या सहा महिन्यांपासून ओरडून सांगितल जातय त्यामुळे मी ते परत परत सांगणार नाहीये. आता कम्युनिटी ट्रान्सफर ची स्टेज येऊन ठेपली आहे. कोरोना कुटुंबाची कुटुंब ग्रासून टाकतो आहे.
यानिमित्ताने मला आपल्या समाजाच्या बेसावध मानसिकतेवर प्रकाश टाकायचाय. एक तर असलं काही भयंकर आपल्या वाट्याला येईलच कशाला ? अशा गाफील भूमिकेत आपण वावरत असतो किंवा येईल तेव्हा येईल पाहून घेऊ अशी वेडाचाराची भूमिका घेतो .फार तर जुजबी काळजी घेऊन आता यापलीकडे मी काही करू शकत नाही असं म्हणून सुटकेचा मार्ग शोधतो. आजच्या परिस्थितीची भयावहता ओळखून आपण आता अती सावधानतेची भूमिका घेणं आवश्यक आहे. कोणी याला घाबरटपणा म्हटलं तरी चालेल. पण सभोवताली जे दिसतय ते खरोखर एक दुःस्वप्न आहे.
सावधगिरी बाळगायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर सर्व काळजी घेऊनही जर *आपल्या घरात कोणाला थोडासा ताप किंवा सर्दी खोकला घसा खवखवणं,अशक्तपणा, अंगदुखी जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे धाव घ्या. ते सांगतील त्याप्रमाणे औषधोपचार आणि टेस्ट करून घ्या*. अशा वेळी वैद्यकीय व्यावसायिक कट प्रॅक्टिस करतात लुटतात वगैरे वगैरे विचार बाजूला ठेवा. प्रत्येक व्यवसायात चांगले वाईट लोक असतातच त्याचप्रमाणे या क्षेत्रात सुद्धा आहेत पण त्या नकारात्मक बाबींची चर्चा करून आपण डॉक्टर्स लोकांची चुकीची प्रतिमा आपल्या मनात स्थापित करतो. मित्रांनो!! परिस्थिती आता आपल्याला फार वेळ देत नाहीये त्यामुळे *कुठलंच आजारपण अंगावर काढू नका* कोरोना ची लक्षण दिसल्यापासून लवकर उपचार घेणं म्हणजे कोरोना चा प्रसार थांबवण्यासारखचं आहे. लक्षणे दिसल्यापासून चार-पाच दिवसांचा अवधी हा गोल्डन पिरेड म्हणून संबोधला जातो. कारण या कालावधीत लवकर उपचार घेतले तर परिस्थिती फारशी चिघळत नाही असं तज्ञ लोक सांगतात.
तुमचा दिवसभरात अनेक लोकांशी संपर्क येत असेल तर विशेष काळजी घ्या. फेसशील्डचा वापर करा. आपले मित्र नातेवाईक अगदी रोजचे कामावरचे सहकारी यांच्यापासून विशिष्ट अंतर ठेवूनच संवाद साधा. कारण आपलेच तर आहेत यांच्यामुळे कुठे काय होतंय ही मानसिकता घात करणारी आहे. अगदी आवश्यकता असेल तर आणि तरच घराबाहेर पडा. थोडे दिवस घरात थांबा मित्रांनो ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्यूटची लस येऊ घातलीए. दोन-तिन महिने आपल्याला संयम ठेवायचा आहे. ज्यांना रोज घराबाहेर पडावं लागतं त्यांनी घरी आल्यावर आवर्जून आंघोळ करणं ,गरम पाण्याच्या गुळण्या करणं, वाफ घेणं, नियमित व्यायाम, श्वासाचे व्यायाम करणं, सत्त्वयुक्त आहार घेणं, शक्य झाल्यास चवनप्राश किंवा विटामिन च्या गोळ्या डॉक्टरी सल्ल्याने घेणं चालू ठेवा. मी तरुण आहे, माझी प्रतिकारशक्ती उत्तम आहे या भ्रमात राहू नका, कदाचित तुम्हाला काही होणारही नाही पण तुम्ही कोरोनाचे वाहक बनाल आणि आपल्या कुटुंबात कोरोनाला आमंत्रण द्याल. कोरोना कॅरियर्स मुळे कोरोनासुर आपल्या कुटुंबात शिरतो. त्याला वेळीच रोखा. खरंतर आता संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आलीआहे. पण सरकार त्या मनस्थितीत नाहीये, म्हणून आपणच अखंड सावधान राहूया! मी जो भयंकर अनुभव घेतला त्यातून धडा घेत माझ्या सुहृदांना सावधान करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे.
उज्ज्वल सुधाकर सराफ
Gemmologist (रत्नतज्ज्ञ)
भुसावळ
येथे क्लिक करुन आपण माझे इतर लेखही वाचू शकता
८)मदनबाण
१०)गुलमोहर