रामायण काळापासूनच श्रीलंका हा देश "सोन्याचीलंका"म्हणून ओळखला जातो . चारही बाजूने समुद्राने वेढलेला हिरव्याकंच वनराईनेे नटलेला हा देश जणूकाही पाचूचे बेट आहे. एका गाण्यात तर....
रम्य ही स्वर्गाहुन लंका
हिच्या कीर्तीच्या सागर लहरी
वाजविती डंका....
असेही वर्णन आहे. आणि रत्नांच्या बाबतीत तर ते खरंही आहे. श्रीलंकेच्या पोटात अगणित रत्नांचे भांडार दडलंय.
जगभरातील रत्नांचे चाहते पुष्कराजच्या ओढीने श्रीलंकेला येत असतात.इथे रत्नपुर नावाचं एक छोटेखानी शहर आहे.रत्नपूरच्या शेता शेतातून आपल्याला रत्नांच्या खाणी बघायला मिळतात. पुष्कराज, नीलम, गार्नेट, स्पिनल अशी वेगवेगळी रत्न या खाणींमध्ये मुबलक प्रमाणात सापडतात. पुष्कराज ची खाण म्हणजे एक प्रकारची चौकोनी आकाराची लाकडाच्या ओंडक्यांनी बांधलेली साधारण सहा फूट बाय सहा फूट लांब रुंद अशी विहीरच असते.या विहिरीच्या तळाशी गेलं की मग अगदी अरुंद असे बोगदे खणलेले असतात .आणि त्यातली माती टोपल्यात भरुन बाहेर काढली जाते. विहिरीच्या तळाशी असणारे हे बोगदे बर्यापैकी लांब असतात. पायाखाली पाणी, अतिशय अरुंद जागा ,ऑक्सिजनची कमतरता आणि अंधार अशा परिस्थितीत पुष्कराज चा शोध सुरू असतो. या पिवळसर मातीतच सापडतो रत्नराज पुष्कराज! रफ पुष्कराज सापडतो तो ओबड धोबड स्वरुपात. त्याला मग पैलू पाडले जातात. मोठ्या आकाराचा रफ पुष्कराज सापडणे दुर्मिळ असते. त्यामुळे रफ पुष्कर ला पैलू पाडतांना त्याचा कमीत कमी भाग वाया जाईल ही काळजी घेतली जाते. सर्वसाधारणपणे अंडाकृती आकारातच पुष्कराज चे कटिंग केले जाते. कारण आयत व चौकोनी आकार करतांना रफ स्टोनचे वेस्टेज खूप जाते. म्हणून हे चौकोनी व आयताकृती पुष्कर थोडे महाग असतात.
पुष्कराज च्या किमती कशा ठरतात ? हा एक कळीचा मुद्दा आहे .एक तर वर सांगितल्याप्रमाणे त्याचा आकार आणि वजन हे दोन घटक किंमत वाढवीण्याला कारणीभूत आहेतच. शिवाय रत्नामधली पारदर्शकता ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते .पुष्कराज जेवढा पारदर्शक तेवढा मौल्यवान! काचेसारखा स्वच्छ आणि पाणीदार पुष्कराज फार दुर्मिळ असतो. कुठेतरी बारीक ठिपका, रेष ज्याला जिरम (Inclusion) असेही म्हणतात हे पुष्कराजच्या पोटात असतेच असते .वास्तविक जिरम च्या विशिष्ट आकारला 10X लेन्स खाली पाहूनच पुष्कराजची पारख केली जाते. मात्र तरीही जिरम कमीत कमी असणे आणि रंग पिवळा असणे हे दोन घटक रत्नांची किंमत ठरविण्यात मोलाची भूमिका वठवतात.
पिवळ्या रंगाचं आणि पुष्कराजचं तर अतूट असं नातं आहे. मात्र हळदी सारखा पिवळाजर्द पुष्कराज मिळणं दुर्लभच.त्याऐवजी हलकी पिवळी छटा असलेला किंवा किंचित पिवळसर पुष्कराज सहज उपलब्ध होतो. या पिवळ्या रंगाच्या मागणीसाठीच पुष्कराज वर ट्रीटमेंट केली जाते. थायलंडमधील कंचनाबुरी या शहरात अशा ग्लास फिलिंग आणि थर्मल ट्रीटमेंट केलेल्या रत्नांची वैश्विक बाजारपेठ आहे. देशोदेशींचे व्यापारी इथून पुष्करची ठोक खरेदी करतात. मात्र भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार असे प्रक्रिया केलेले रत्न अजिबात वापरू नये. इथल्या पुष्कराजला बँकॉक सफायर म्हणून ओळखले जाते. साधारण ब्रांडी सारखा पिवळसर तपकिरी यांचा रंग असतो. दागिन्यांमध्ये जडवीण्यासाठी जसे नेकलेस, पेंडन्ट सेट यासाठी बँकॉक सफायर चालतात. कारण ते श्रीलंकेच्या नैसर्गिक पुष्करच्या तुलनेने फार स्वस्त असतात. पण ज्योतिषीय दृष्टिकोनातून पुष्कराज वापरणार्यानी असे पुष्कराज घेऊ नयेत.
पुष्कराज हे गुरु ग्रहाचे रत्न आहे .गुरूला पिवळा रंग प्रिय म्हणून पिवळ्या पुष्कराजला जास्त मागणी असते. पुष्कराज मध्ये पांढरा ,गुलाबी, केशरी, हिरवा अशा रंगांचे ही पुष्कराज सापडतात पण पिवळा पुष्कराजच जास्त भाव खाऊन जातो. पांढरा पुष्कराज हा शुक्राचं उपरत्न म्हणून वापरला जातो. तर निळा रंग असेल तर तो नीलम म्हणून ओळखला जातो. को रँडम नावाचा हा रत्नीय खनिजांचा एक परिवार आहे. यात माणिक नीलम आणि पुष्कराज अशी नवग्रह परिवारातील महत्त्वाची रत्ने येतात .टोपाज अर्थात सुनहला हे पुष्कराजचं उपरत्न आहे.मात्र बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की पुष्कराजचं इंग्रजी नाव टोपाज आहे. मात्र तसं नसून Yellow sapphire हे पुष्कराजचं इंग्रजी नाव आहे.
पुष्कराज हे किमती रत्न असल्याने त्याचे डुप्लिकेट मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. आकर्षक पिवळा रंग, पारदर्शी स्वच्छ आणि चमकदार दिसणारे हे खडे कमी किंमतीला उपलब्ध होतात. काही लोक तर चक्क सर्टिफिकेट्स सह हे बनावट खडे विकतात .आणि ग्राहकही कोणतीही शहानिशा न करता विकत घेतात .तेव्हा केवळ गॅरंटी कार्ड जोडलेले आहे म्हणून तो खडा अस्सल आहे हा समज कृपया मनातून काढून टाका.
नवग्रहांच्या रत्न मालिकेत उत्तम मागणी असलेलं गुरु ग्रहाचं हे रत्न अत्यंत फलदायी समजल जातं म्हणून असंख्य लोक आपल्या तर्जनी मध्ये पुष्कराज सोन्यात धारण करतात आणि नव्या उमेदीने यशोशिखराकडे वाटचाल करतात.
उज्ज्वल सुधाकर सराफ
रत्नतज्ञ (Gemmologist)
लिंक वर क्लिक करा आणि इतर लेख ही वाचा