Wednesday, February 26, 2020

चला रत्नांच्या दुनियेत!!! भाग १

रत्नांच्या दुनियेत

       
            (भारतातील रत्‍नसंपदा)


आदिम काळात मानव पृथ्वीवर जन्माला आला .हळूहळू स्वतःच्या गरजा आणि संरक्षणासाठी त्याने आपल्या बुद्धीचा वापर करून अन्न,  वस्त्र ,निवारा यांचा शोध घेतला .अगदी तेव्हापासूनच त्याची सौंदर्यदृष्टी जागृत होत गेली .त्याकाळी विविधरंगी दगडांच्या माळा घालून त्याने रत्नांच्या वापरायला सुरुवात केली. तेव्हा पासुन ते आजच्या माहिती तंत्रज्ञान युगापर्यंत माणसाला रत्नांविषयी अनामिक ओढ वाटते आहे. रत्नांचे आकर्षक रंग ,त्यांचं विलोभनीय तेज अनंत काळापर्यंतचे त्यांचे आयुष्य आणि दुर्मिळता यामुळे रत्नांना मूल्य प्राप्त झालं. आपल्या संस्कृतीत तर रत्नांच्या शुभाशुभ परिणामाविषयी थक्क करून टाकणारे दाखले सापडतात. म्हणूनच रत्नांच्या या अद्भुत दुनियेत जाताना अगोदर मागे वळून त्यांचा इतिहास पहायला पाहिजे .रामायण काळात मोठ्या प्रमाणात रत्ने सापडत होती असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आढळतो. समुद्रकिनारी मोती आणि प्रवाळांच्या राशीच्या राशी पडलेल्या असत. मंदिर आणि राजवाड्यांचे खांब रत्नजडित असत. तुलसीदास रचित श्रीरामचरितमानस मध्ये प्रभू रामचंद्रांच्या बालपणाचे वर्णन करताना ते म्हणतात ,बालरामाला रत्नजडित कटी सूत्र होते. रामाचा रंगदेखील नीलम रत्न प्रमाणे श्यामल होता .महाभारत कालीन मयासुर हा फार मोठा रत्नपारखी होता. तो आपल्या शिल्पकृतीत रत्नांचा वापर करत असे. खांडववन दग्ध करण्याच्या वेळेस अर्जुनाने मयासुरला जीवदान दिले .त्या उपकाराची परतफेड म्हणून मयासुराने पांडवांना रत्नजडित राजवाडा बांधून दिला .त्याचे नाव मयसभा .त्या मयसभेच्या मध्यभागी एक तळे तयार केले होते. त्या तळ्यातील कमळे रत्नां पासून तयार केली होती. कमळांची पाने वैडूर्य रत्नां पासून तयार केली आणि फुले माणकां पासून बनवलेली होती .तळ्याच्या पायऱ्या वेगवेगळ्या स्फटिक रत्नां पासून तयार केल्या होत्या. ही मयसभा व त्यातील हे तळे आभास निर्माण करणारे होते .त्यामुळे या मयसभेत दुर्योधनाची मोठी फजिती झाली होती. आणि त्याला द्रौपदी हसली होती .दुर्योधनाच्या या अपमान प्रसंगा पासून कौरव-पांडवातील द्वेशाग्नी भडकत गेला आणि त्याचे पर्यावसान महाभारत युद्धात झाले.

महाभारत काळात रत्ने वस्तुविनिमया साठी देखील वापरली जात. चलना प्रमाणे  त्यांचा उपयोग होत असे. रत्नांच्या माध्यमातून राजे लोक एकमेकास नजराणे अथवा खंडणी देत असत. जरासंधाच्या मृत्यूनंतर त्याच्या कैदेतील राजांनी भीम आणि श्रीकृष्णाला मौल्यवान रत्ने भेट म्हणून दिलीत .राजसूय यज्ञाच्या दिग्विजय मोहिमेत अनेक राजांनी पांडवांना रत्नांच्या रूपाने खंडणी दिली. पूर्वेकडील दिग्विजयात भिमाला म्लेंछांकडून मोती ,स्फटिक आणि पोवळ्या च्या रूपात खंडणी मिळाली असा उल्लेख सापडतो. कौरवांशी खेळलेल्या द्युतात धर्मराजाने सर्वप्रथम आपल्या गळ्यातील माणिक रत्नाचा हार पणास लावला होता. रामायण-महाभारत काळ हा भारताचा सुवर्णकाळ होता. म्हणून या काळात रत्ने आणि सुवर्ण विपुल प्रमाणात उपलब्ध होते असे कोणी म्हणेल .परंतू चीनी यात्रीक ह्यु -एन-त्संग भारतात आल्यावर त्याने त्याच्या रोजनिशीत तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे जे वर्णन केले आहे त्यात रत्न विषयक माहिती मिळते .ह्यू-एन-संग म्हणतो राजे लोक ज्या सिंहासनावर बसत ते वेगवेगळ्या रत्नांनी विभूषित असत. त्या सिंहासनाला मोत्यांच्या झालरी लावलेल्या असत. राजे लोक पाय ठेवण्यासाठी जे पदपीठ वापरीत तेसुद्धा रत्न मंडीत असे. प्राचीन भारतात विपुल रत्नसंपदा होती म्हणूनच चीनी यात्रीका ने  असे वर्णन केले हे सिद्ध होते .या रत्न आणि सुवर्णाच्या आमिषाने भारतावर आक्रमणे होऊ लागली .लुटीच्या हेतूने भारतावर पहिली स्वारी निनेवीची राणी सेमिरामिस ने केली .ही सर्वांची इ.पू.पूर्व 234 वर्ष केल्याने तिने किती संपत्ती लुटून नेली याची माहिती मिळत नाही .त्यानंतर अलेक्झांडरने पंजाब आणि सिंधचा समृद्ध प्रदेश लुटून नेला. या दोन आक्रमकांनी किती लुट नेली याची नोंद इतिहासात नाही. मात्र नंतरच्या आक्रमकांनी नेलेल्या लूटींची आकडेवारी उपलब्ध आहे .
महंमद गझनीने नगरकोटच्या देवस्थाना वरील चौथ्या स्वारीत २० मण  हिरे-मोती ,७ लक्ष सोन्याचे दिनार. 200 मण सोन्याच्या लगडी, ७०० मण सोन्याचे दागिने व 2000 मण चांदी लुटून नेली .याच गझनीने भिमनगर किल्ल्यातील आठव्या स्वारीत 90 फूट लांब 45 फूट रुंदीचे एक चांदीचे देवघर लुटून नेले ,शेवटची स्वारी त्याने सोरटीसोमनाथ वर केली.त्यात त्याने मंदिरातील मौल्यवान हिरे ,माणिक, मोती, नीलम, सोने आणि चांदी या सर्वांची लूट करून नेली .गझनीनेने आपल्या सोट्याने सोमनाथा ची मूर्ती फोडल्यावर त्यातून हिरे माणकांचा जमिनीवर ढीग पडला. ही यादी बरीच मोठी आहे .महंमद गझनीने नेलेल्या लुटीचे मूल्य त्या काळात तीस कोटी रुपये होते .यावरून आपल्याला त्या काळातील भारताच्या समृद्धीची कल्पना येईल. देशात सोन्याचा धूर निघत असे जे वर्णन आपण कथा कादंबर्‍यात वाचतो ते शब्दशहा खरे होते असे या माहितीवरून वाटते.

गझनीच्या महंमदा नंतर अलाउद्दीन खिलजीने आक्रमण केले, रामेश्वरच्या लूटीत त्याने हजारो हिरे-मोती माणिक आणि 96 हजार मण सोने नेले. विजयनगर राज्यात हिऱ्यांच्या अनेक खाणी होत्या .25 कॅरेट पेक्षा जास्त वजनाचा हिरा खाणीत सापडल्यास तो राजालाच दिला पाहिजे असा दंडक होता. तालिकोट च्या लढाईत विजयनगरचा रामराजा पालखीतून सैनिकांना उत्तेजन देत होता ,ती पालखी रत्नांनी मढवीलेली होती. या युद्धात पराक्रम गाजवलेल्या सैनिकांना रामराजा ओंजळी भरभरून हिरे-मोती आणि पाचू इनाम म्हणून देत होता. रामायण महाभारत कालीन रत्न संपदेला शास्त्रीय पुरावे आज उपलब्ध नाहीत म्हणून कोणी त्यावर कल्पित वर्णन म्हणून शेरा देईल. परंतु बाराव्या शतकानंतर च्या लुटीची वर्णने ही पुराव्यानिशी सिद्ध झाली आहेत. केवळ हिंदूंच्या असंघटितपणामुळे हजारो किलोमीटरवरून परकीय आक्रमक आले आणि त्यांनी आपला संपन्न देश लुटून नेला. आज तरी आपण यावरून काही धडा घेणार आहोत का ??  इतिहास हा भविष्यकाळासाठी वर्तमानकाळाला मार्गदर्शक असतो .इतिहासातील चुकांची जे पुनरावृत्ती करतात त्यांच्या कपाळी पुन्हा तोच इतिहास लिहिला जातो.


सुरुवातीला आक्रमण करणारे मुगल आक्रमक नंतर देशावर राज्य करू लागले .शहाजहान बादशहाच्या राज्यारोहण प्रसंगी त्याने एक अंबर रत्नाचा दिवा तयार केला होता या दिव्यात त्याने मोठा गोवळकोंडी  हिरा बसवला होता .हा अठरा शेर वजनाचा दिवापुढे मक्केस पाठविण्यात आला. शहाजहानने स्वतःसाठी सात सिंहासने तयार केली होती. ती सर्व माणिक ,पाचू ,नीलम ,पुष्कराज ,मोती आणि हिरे यांनी सजविली होती असे वर्णन फ्रेंच प्रवासी टेव्हरनिअर यांनी केले आहे. १६५५ते १६६७ या काळात  फ्रेंच प्रवासी बर्नियर हा मोगलांचा राजवैद्य होता .त्याने आपल्या ग्रंथात मयुरासन आणि बादशहा रोज धारण करीत असलेल्या अलंकारांची तसेच मोगलांच्या खजिन्यात हिरे मोत्यांच्या राशी होत्या अशी वर्णने केली आहेत.

मोगल सम्राटांच्या अस्तानंतर महाराष्ट्रात पेशवाईचा उदय झाला. पेशव्यांकडे देखील प्रचंड रत्न संपदा होती .ति ते ब्राह्मणांना दान करीत असत असे उल्लेख जागोजागी सापडतात. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहधर्मचारिणी श्रीमंत रमाबाई साहेब सती गेल्या त्यावेळी त्यांनी आपल्या हातातील हिरेजडीत बांगड्या दान केल्या. पेशवाई धोक्यात असताना पेशव्यांनी आपल्या खजिन्यातील मौल्यवान रत्ने नेपाळ नरेशाला विकली .त्यातील काही रत्ने आजही नेपाळच्या राजघराण्याकडे आहेत. पेशवाई बुडाल्यानंतर इंग्रजांचा अंमल सुरु झाला .त्यांनीदेखील सर्व संस्थाने खालसा केली .संस्थानिकांकडे असलेली मौल्यवान रत्ने इंग्लंडला नेली.  पंजाबच्या महाराजा दिलीप सिंग कडून नेलेला जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा आजही लंडनमध्ये व्हिक्टोरिया राणीच्या मुकुटात पाहायला मिळतो. हजारो वर्षांपासूनचा हा रत्नांचा इतिहास भारतीयांना रत्नांविषयी किती ओढ आहे आणि रत्नांच्या धारण करण्याने काय फायदे होतात याची माहिती ज्योतिषी तज्ञांना किती सखोलपणे होती हेच दर्शवितो .आज देखील आपल्या देशात रत्नां पासून मिळणाऱ्या फायद्यांसाठी लाखो लोक विविध रत्ने आपल्या बोटात धारण करीत असतात.



भयंकराशी भेट

भयंकराशी भेट दिनांक २४ ऑगस्ट २०२० च्या सकाळी मोबाईलची रिंग वाजली तेव्हा कल्पनाही नव्हती की ही एक भयप्रद घंटा आहे . माझ्या अगदी ज...