झाडांना वशीकरण विद्या अवगत असावी असा मला दाट संशय आहे. तुम्ही वारंवार झाडांच्या संपर्कात जात राहीलात तर झाडं तुमच्यावर प्रेमजाल फेकतात आणि मग हमखास तुम्ही त्यांच्या प्रेमात पडतातच पडतात. काही मांत्रीकांना भानामती /काळीजादू करण्याची कला येते तशी झाडांना पण हिरव गारुड करण्याची कला ठाऊक असते असा शोध मला लागला आहे. आणि एकदा का हे हिरव गारूड तुमच्या मेंदूत जाऊन बसलं की मग ते तुमचा पुरता ताबा घेतं आणि तुम्ही झाडं, पानं ,फुलं यातच गुंतत जातात .झाडांचा हिरवा रंग तुम्हाला वेडं करतो. खरंतर लहानपणी शाळेत असताना मला हिरवा रंग अजीबात आवडत नसे, का? तर तो पाकिस्तानचा रंग आहे असा माझ्या मनाचा पक्का समज होता, त्यात पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा युनिफॉर्म हिरवाजर्द. त्यावेळी ५०षटकांचं वन डे क्रिकेट जोमात होतं आणि टीव्हीवर आकाशी युनिफॉर्म वाली आपली टीम विरुद्ध हिरव्या रंगाची दुश्मन की टीम असं युद्ध रंगायचं .त्यामुळे हिरवा रंग म्हणजे शत्रू पक्षाचा ! असंच शालेय जीवनात मला वाटत असे त्यामुळे की काय पूर्वी माझे वडीलही मला तू जरा हाफ मॅड आहेस असं म्हणत असत. आता तर ते मला माझं फुलझाडांचं वेड पाहून गमतीने 'फुलवेडा' असं म्हणतात आणि माझ्या बायकोला 'फुलवेडी'.
आपण रस्त्याने जात असलो की झाडं आपल्याला खुणावतात आणि म्हणतात ओळख मला?? बघ माझी पानं, फुलं ,उंची, खोडाचा रंग मग आपल्याला झाड ओळखण्याचा छंदच लागतो, आणि अवचितपणे एखादं खास आवडीचं झाड भेटलं की मग विचारूच नका दिवसभर आपला मूड जाम खुश असतो. असचं एकदा नासिक वणी मार्गावर वसंत ऋतूमध्ये प्रवास करत असताना मला रस्त्यात काटेसावर भेटली आहाहा!! विलक्षण सुंदर!!! आपला सगळा पर्णसंभार उतरून ती नखशिखांत लाल फुले ल्याली होती तिचं ते रक्तवर्णी रूप अनेक रूपगर्वितां पेक्षा कितीतरी मादक होतं आणि म्हणूनच का तिला सर्वांगावर काटे होते ?? माहित नाही .पण ती शाल्मली कायमची माझ्या मनात ठसली आहे.
फुलझाडांचं वेड म्हणजे अक्षय आनंदाचं झुंबर. या फुलवेडातून काही नमुनेदार अनुभव आपल्या वाट्याला येतात त्या अनुभवां पैकीच हा एक अनुभव......
लडाख मधल्या लेह शहरा पासून उत्तरेकडे खरडूनग्ला पास हा जगातला सर्वात जास्त उंची वरून जाणारा हायवे आहे.(१८३८० फूट) ,अतिशय खडतर रस्ता,बर्फ़ाच्छादित शिखरं पार करून सियाचीन या जगातल्या सर्वोच्च युद्धभूमी कडे घेऊन जाणारा हाच तो हायवे. खरडूनग्ला पास पार केलं की तीव्र उताराची वळण घेत गाडी धाऊ लागते नुब्राव्हॅलीच्या दिशेने ,भोवतीचा निसर्ग पाहताना आपण परग्रहावर तर नाही ना आलो अस वाटावं इतका तो वेगळा वेगळा आहे. २०१६ च्या जून महिन्यात आम्ही लडाख ला गेलो होतो.नुब्रा व्हॅलीत डिस्कीट नावाचं छोट निम शहरी गाव आहे. लडाखी माणूस साधा सरळ, अजून तरी काश्मिरी लोकांसारखा तो व्यवहारी झालेला नाही. डिस्कीट मधल्या रिअल सियाचीन या लॉजवर उतरलो. तिथल्या छोट्याशा बागेत केशरी लिलीची सुंदर फुल फुलली होती, आपल्या भागात मी तरी कधी लिलीचा असा केशरी शेड पाहिलेला नाही, लॉज च्या लडाखी मालकिणीला विनंती केली, तिने लिलीचा कंद काढून दिला, मग प्लास्टिक पिशवीत माती त्यात थोडं पाणी घालून आम्ही तो कंद डिस्कीट- लेह-कारगिल-श्रीनगर-मुंबई- भुसावळ असा सांभाळून आणला.घरच्या बागेत लावला, त्याला खतपाणी घालून वाढवला,डिस्कीटची आठवण म्हणून त्याच नाव ठेवलं "डिस्कीट"
डिसेंबरात घराच्या नूतनीकरणा च काम सुरु झालं, गवंडी,प्लंबर,वायरमन,फेब्रिकेशनवाले,सुतार,पेंटर इ.इ.करागिरांचा एकच गोंधळ सुरु झाला. त्यात ते डिस्कीट तुडवल जात होत,आम्ही कामगारांना समजवत, ओरडत डिस्कीटला सांभाळत होतो. पण कसलं काय फेब्रुवारीत एक दिवस त्याचा पार चेंदामेंदा झाला.डिस्कीट गेलं !
रोज सकाळी बागेत पाणी घालताना मी त्या जागेकडे हताशपणे बघायचो.त्या मोकळ्या जागेवर कधीतरी वेड्या आशेने पाणीही घालायचो.
आणि चैत्रातल्या एका सकाळी " एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी" अस म्हणत डिस्कीट लिलीचे अंकुर लीलया जमिनीतून वर डोकावताना दिसले.झपाट्याने ते वाढत गेले. भोवताली वैशाख वणवा पेटलेला असताना लडाख सारख्या अतिशीत प्रांतातील ते झाड कळ्यांनी डवरलं, आणि जेष्ठातल्या कडकडीत उन्हात त्याला सुंदर सोनकेशरी फुल आलं!!!
सगळ्या संकटावर मात करत प्रतिकूलतेशी लढत,कणखरवृत्तीच्या पण अंतरात कोवळीक जपणाऱ्या लडाखी माणसाचं रूपच जणू, डिस्कीटचं फुल
डिस्कीटचं फुल👆
उज्ज्वल सराफ
रत्नतज्ज्ञ(Gemmologist)
येथे क्लिक करा आणि हे पण अवश्य वाचा
८) मदनबाण
डिस्कीट चे फुल खूप सुंदर दिसतेय. काटेसावरीचे वर्णन खूप सुंदर! तुमचे लक्ष झाडे झुडपे पाने फुले यांच्या कडे असते हे कौतुकास्पद आहे. डिस्कीटच्या झाडाचा कंद तुम्ही ज्या प्रकारे मिळवला जपून आणला आणि लावला, त्याची प्रेमाने जपणूक केली, ते पहाता तुमच्या प्रेमळ निगराणीनेच त्याला पुनर्जीवित केले आहे. तुम्हा दोघांचे झाडाझुडुपांचे फुलांचे वेड पाहून 'जे वेड मजला लागले तुजला ही ते लागेल का?' या न्यायाने सगळ्यांना हे वेड लागो ही सदिच्छा
ReplyDeleteतुमची सदिच्छा फलद्रूप होवो या अपेक्षेसह धन्यवाद!
DeleteNatures beauty beautifully appreciated
ReplyDeleteThanks
Deleteहिरा व्यापारी इतका कोमल असू शकतो? तुझ्यातला साहित्य डिस्कीटअसाच फुलु देत. फुल मोहक आहे.भट्टी छान जमली.
ReplyDeleteहे जग विरोधाभासाने भरलेलं आहे हेच खरं... धन्यवाद!!!
DeleteSahiiiii.....
ReplyDeleteThanks!! Suvarna
Deleteउज्ज्वल खूप छान वर्णन केलाय मजा अाली वाचायला। नि फुल तर फारच छान आहे .
ReplyDeleteखूपच सुंदर लेख. झाडांनाही भावना असतात. तुमचे प्रेम, भावना, आपुलकी ते नक्कीच जाणतात आणि त्याप्रमाणे प्रतिसादही देतात. तुमच्या भावना, तुम्ही त्या झाडावर केलेली माया, प्रेम या सगळ्यांना त्याने प्रतिकूल परिस्थितीतही पुनर्जन्म घेऊन प्रतिसाद दिला. तुमची रोजची तळमळ, हूरहूर, हताशपणा कदाचित त्याला बघवत नसेल,आणि म्हणूनच तुमच्याच बागेत त्याने पुनर्जन्म घेतला, नव्हे, तुमच्या उत्कट प्रेमाने आणि तळमळीने त्याला घ्यावाच लागला. तुमच्यासारखी झाडा-वेलींवर अशी उत्कट आणि निरागस प्रेम करणारी माणसं त्यांना क्वचितच भेटत असतील आणि म्हणूनच तुमच्या उत्कट प्रेमामुळे ती स्वतःच वशिभूत होऊन जातात. खरचं एका वेगळ्याच विश्वात जावून रममाण झाल्यासारखं वाटलं. आणि तुम्हाला वेलींमधले हरवलेले सुंदर माणिक परत गवसल्याचा खूप आनंदही झाला.
ReplyDeleteखरंय तुमचं म्हणणं, धन्यवाद!!!
Deleteकळत न कळत तुम्च्या छंदातून आणि आववडीतून तुम्ही पर्यावरण जपता हे नक्कीच जाणवते, आणि तसा संदेशही जातो. प्रत्येकाला झाडा-वेलींवर प्रेम करणे जमले नाही तरी जपण्याची तरी जाणीव व्हावी हीच इच्छा आणि अपेक्षा.
ReplyDeleteपर्यावरण प्रेमाचा वसा वृद्धिंगत व्हावा हीच अपेक्षा , धन्यवाद
ReplyDeleteखूप छान मी पण बाग वेडी असल्याने अजून छान वाटला लेख
ReplyDeleteखूपच सुंदर लेखन । लेखन शैली आणि अनुभव एकदम छान ।
ReplyDelete