Showing posts with label रत्न. Show all posts
Showing posts with label रत्न. Show all posts

Friday, March 13, 2020

लखलखत्या हिऱ्यांची झगमगती दुनिया!

चला रत्नांच्या दुनियेत!!! या लेखमालेतील तिसरा लेख

 हिरा है सदा के लिये !


हिरा या वस्तू बद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल मिश्रितभीती असते. कुतूहल यासाठी की पुराणकाळातल्या कथांपासून तर आजच्या हिंदी चित्रपटांपर्यंत हिऱ्या बद्दल अनेक अद्भुतरम्य कथा आहेत. आणि भीती यासाठी की हिरा हा अतिप्रचंड किमतीचा असून तो आपण खरेदी करणे तर दूरच पण पाहायला मिळणे देखील दुर्लभ आहे ,अशी समजूत सामान्यतः होती .परंतु१९९० च्या दशकात ही समजूत दूर करण्याचा चंग D Bears या कच्च्या हिऱ्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने बांधला. आणि भारतीय हिरे बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू झाली .खरंतर De bears ही कंपनी पैलू पाडलेले हिरे विकत नाही .तरी देखील टीव्ही आणि वर्तमानपत्रातून ही कंपनी कोट्यावधी रुपयांच्या हिऱ्यांच्या जाहिराती प्रसारीत करु लागली ?D Bears ही हिऱ्यांच्या खनन क्षेत्रातील सर्वात मोठी मक्तेदार कंपनी आहे.आफ्रिकेत विशेषतः दक्षिण आफ्रिकेत हिऱ्यांच्या खाणी त्यांच्या मालकीच्या आहेत. जगात उत्पादित होणाऱ्या कच्च्या हीर्यापैकी ७० टक्के एवढा प्रचंड उत्पादनाचा वाटा एकट्या D bears या इंग्लंडस्थित कंपनीचा आहे. १९९५साली Dbears वाल्यानी भारतात प्रथमच आपलं जाहिरात कार्यालय थाटलं आणि त्यांच्या लक्षात आलं की  भारतातला हिरे बाजार हा अतिशय संकुचित आणि ठराविक उच्चभ्रू वर्गापुरताच मर्यादित आहे .मग त्यांची मार्केटिंगवाली माणसं कामाला लागली आणि भारतीय हिरे बाजार घुसळून निघाला.चक्क मराठी वर्तमानपत्रात हिऱ्यांच्या जाहिराती झळकू लागल्या. हिरा प्रचंड महाग असतो या समजुतीला तडा गेला. हिऱ्यांची खरेदी सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आवाक्यात आली.D bears चे प्रयत्न फळाला आले. आणि सोन्याच्या दागिन्यां सोबत सामान्य लोक हिर्‍याच्या अंगठ्या, पेंडेंटआणि नाकातल्या फुल्या खरेदी करू लागले.
फार पूर्वीपासून भारतात हिऱ्यांना पैलू पाडण्याचा मोठा उद्योग आहे. भारतीय हिरे घसू कारागिरांचे कसब जागतिक दर्जाचे आहे. पूर्वी कच्चे हिरे भारतात येत त्यांना प्रामुख्याने सुरत इथं पैलू पाडले जातंआणि मग ते परदेशात निर्यात होत असत.
 जगात हिऱ्यांचा शोध तीन हजार वर्षांपूर्वी प्रथम भारतात लागल्याची नोंद आहे. ब्राझीलमध्ये १७२५ साली हिर्‍यांची खाण सापडेपर्यंत जागतिक हिरे बाजारात भारताची मक्तेदारी होती .जगात दंतकथा होऊन बसलेले कोहिनूर, आग्रा डायमंड ,ग्रीन ड्रेस्डेन हे सर्व भारतीय हिरे आहेत. वराहमिहिराच्या बृहत्संहितेत आणि वात्स्यायनाच्या कामसूत्र ग्रंथांमध्ये रत्न परीक्षणाच्या  शास्त्रीय कसोट्या सांगितल्या आहेत. हिऱ्यांना पैलू  पाडण्याचे कसबही तेव्हापासूनच पारंपारिकपणे आपल्याकडे चालत आले आहे . साधारणतः  अठराव्या आणि एकोणिसाव्या शतका दरम्यान भारतातील हिऱ्यांचे उत्पादन जवळपास बंद पडले. आज केवळ मध्य प्रदेशातील पन्ना या हिऱ्यांच्या खाणीतून अल्प प्रमाणात उत्पादन सुरू आहे. पन्ना ही एकाचं वेळी अगदी गरीब पण अतिशय श्रीमंत अशी खाण आहे .गरीब अशाकरता की तेथील हिऱ्यांचे उत्पादन वर्षाला केवळ २०००० कॅरेट इतकच आहे. आणि श्रीमंत अशासाठी की या खाणीत सापडणारे ७०% हिरे हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असतात, इतरत्र हे प्रमाण केवळ ३५ टक्के इतकेच आहे.
हिऱ्याची पारख ही त्याच्या तेजस्वीतेवर ठरते. हिरा सर्वात तेजस्वी आहे . हिऱ्या यासारखी दुसरी कठीण वस्तू जगात नाही. त्याच्या कठीणपणामुळेच त्याला अचूक पैलू पाडता येतात. प्रत्येक गोल हिऱ्याला ५७ पैलू असतात .मग तो कितीही मोठा असो अथवा लहान. अगदी टाचणीच्या माथ्यावर बसू शकेल इतक्या लहान हिऱ्यालाही ५७ पैलू पाडावे लागतात. शिवाय ते ठराविक कोनातच पडावे लागतात. अन्यथा हिरा चकाकत नाही. हिऱ्याची प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता सर्वाधिक आहे. मात्र अंधारात देखील हिरा चमकतो ही कल्पना चुकीची आहे. हिरा स्वयंप्रकाशी नाही. अथवा अंधारात चमकायला तो काही छोटा बल्ब किंवा ऊर्जेचा स्त्रोत नाही. मात्र त्याच्यावर प्रकाश किरण टाकले तर तो अंधारातही उजळून निघतो. हिऱ्याची पारख ही ४ महत्त्वाच्या निकषांवर होते . Cut ,carat ,clarity, colour यालाच  4C असेही म्हणतात. हिऱ्यामध्ये देखील विविध रंग असतात. परंतु पांढरास्वच्छ हीराच मागणी च्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या 4c व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा 'सी'असतो तो म्हणजे कॉन्फिडन्स चा 'सी'. अर्थात विश्वासू माणसाकडून हिरा खरेदी करणं.कारण हिऱ्यासारख्या मौल्यवान वस्तूत फसवणुकीचे प्रमाण फार मोठे आहे. हिऱ्यासारखे दिसणारे मातीमोल किमतीचे अमेरिकन डायमंड देऊन सर्रास फसवणूक होत असते. म्हणून विश्वासू रत्नपारख्या कडून खरेदी करणे महत्त्वाचे ठरते.
 हिरा हे शुक्राचे रत्न आहे. शुक्राच्या चांदणीसारखं तेजःपुंज ! ऐश्वर्य आणि  संपन्नतेचं लक्षण.माणसाच्या पराक्रमात वाढ करणारं ,त्याला तेज प्राप्त करून देऊन त्याच्यासाठी यशस्वितेचा मार्ग सुलभ करणारं एक चिरंतन रत्न!!! म्हणूनच तर म्हणतात A diamond is forever अर्थात हिरा है सदा के लिये !

उज्ज्वल सुधाकर सराफ

Friday, March 6, 2020

चला रत्नांच्या दुनियेत भाग 2

चला रत्नांच्या दुनियेत" या लेखमालेतील लेख क्र. २

रत्नांची जन्मकथा!

रत्न म्हणजे साक्षात वैभव! रत्न म्हणजे सौंदर्याचा मानबिंदू! म्हणून तर "भारतरत्न" हा सर्वोच्च किताब तयार करण्यात आला .रत्नांच्या या नवलपूर्ण दुनियेत पाउल टाकताना रत्नांची उत्पत्ती कशी होते? हे जाणून घेतले पाहिजे. लाखोंवर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. त्यावेळी पृथ्वी म्हणजे लाव्हा रसाचा तप्त गोळा होती.कालांतराने पृथ्वीवर वातावरण निर्मिती होत गेली. आणि हळूहळू लाव्हारसा चे रूपांतर खडक आणि खनिजांमध्ये होत गेले .पृथ्वीच्या पोटातील उष्णता आणि वरून असणारा जमिनीचा भार  यामुळे ठराविक ठिकाणी भूगर्भीय  प्रक्रिया होऊन रत्नांचा जन्म पृथ्वीच्या पोटात होऊ लागला .विशिष्ट प्रकारची खनिज संयुगे, उष्णता, गॅस  आणि जमिनीचा प्रचंड भार  यामुळे निर्माण होणाऱ्या रत्नांना आकर्षक रंग आणि चकाकी प्राप्त झाली. भुगर्भात  होणाऱ्या हालचालींमुळे पृथ्वीच्या पोटातील ही रत्ने काही ठिकाणी ज्वालामुखीच्या मार्गातून बाहेर आली आणि मानवाला रत्नांचा शोध लागला. वैशिष्टपूर्ण रासायनिक मिश्रणामुळे रत्न धारण करणाऱ्यांना आश्चर्यकारक फायदे मिळू लागले. आणि मग रत्नांसाठी चक्क लढाया सुरू झाल्यात.

रत्ने जशी दगड आणि खनिजां पासून बनतात तशीच काही जैविक रत्ने सुद्धा आहेत .उदाहरणार्थ मोती, पोवळा, अंबर इ.रत्ने जैविक म्हणजेच सजीवांपासून बनलेली आहेत. मोती हे रत्न समुद्रातील शिंपल्यात राहणाऱ्या कालवा पासून बनते तर पोवळा हे कोरल नावाच्या समुद्री वनस्पती मध्ये सापडते. अंबर हे दुर्मिळ रत्न झाडातून पाझरणाऱ्या द्रव्यापासून बनते. जगप्रसिद्ध जुरासिक पार्क चित्रपटातील डायनासोर जन्माची कथा अंबर या रत्ना पासून सुरू होते. एका शास्त्रज्ञाला हजारो वर्षांपूर्वीचे अंबर रत्न सापडते आणि त्या रत्नात एक डास असतो जो डायनासोर ला चावलेला असतो आणि त्याच्या पोटात डायनासोरचे रक्त असते डायनासोरचे  डी एन ए त्या रक्तातअसतात. त्या अंबर रत्नातून डीएनए बाहेर काढून त्यापासून पुन्हा डायनासोर जन्माला घातला जातो  असे कथानक  चित्रपटात दाखवले आहे. मध्यंतरी चीनमध्ये खरोखरच अशा प्रकारचे अंबर रत्न सापडले परंतु त्यातील डी एन ए पासून डायनासोर ची निर्मिती करणे अजून तरी शास्त्रज्ञांना जमले नाही . 

रशियातील सेंटपीटर्सबर्ग या शहरापाशी पुष्किन पॅलेस (कॅथरीन पार्क) नावाचा एक सुप्रसिद्ध राजमहाल आहे. या महालातील एक दालन अंबर हॉल म्हणून प्रसिद्ध आहे.त्या दालनाच्या भिंती आणि छतावर सर्वत्र अंबर रत्न जडवलेले आहे. अतिशय मनमोहक कारागिरी आणि  थक्क करून टाकणारा हा अनुभव मी घेतलाआहे.




रत्नांची उत्पत्ती स्थाने जगभरात विविध ठिकाणी आहेत त्यामुळे एकाच जातीच्या रत्नांमध्ये रंगांच्या विविध छटा बघायला मिळतात .जसे झांबियन पाचु हा गडद हिरवा असतो .तर कोलंबियात सापडणारे पासु फिकट हिरव्या रंगाचे असतात. ब्राझीलमध्ये सापडणाऱ्या पाचूत पारदर्शकता कमी असते. अशा प्रकारे एकाच रत्नात त्याच्या विविध खाणीं प्रमाणे  रंग, पारदर्शकता आणि तेज यांच्यात फरक पडत जातो .ज्योतिषशास्त्रात एकूण ८४ प्रकारची रत्ने सांगितली आहेत .मात्र प्रत्यक्षात दोन हजाराहून अधिक प्रकारची रत्ने पृथ्वीच्या पोटात दडली आहेत. म्हणून तर पृथ्वीला रत्नगर्भा असेही म्हटले जाते.

या दोन हजार प्रकारच्या रत्नांमध्ये नवग्रहांची केवळ नऊ रत्ने प्रमुख अथवा मौल्यवान समजली जातात. भृगूसंहितेमध्ये रत्नांचा संबंध विविध ग्रंहांशी जोडलेला आहे .सूर्य(रवी )-माणिक, चंद्र (सोम)- मोती ,मंगळ -पोवळा ,बुध-पाचू, गुरु- पुष्कराज, शुक्र-हिरा, शनि- नीलम ,राहू-गोमेद,केतू- वैडूर्य (लसण्या) या सर्व  रत्नांची वैशिष्ट्ये, संयुगे ,काठिण्य विशिष्ट घनता वेगवेगळी आहे आणि त्यामुळेच त्यांची पारख करणे शक्य होते.आजपर्यंत केवळ अनुभवातून अथवा परंपरेतून आलेल्या ज्ञानातुन रत्नांची पारख करण्यात येत असे मात्र आता विज्ञानयुगात विविध वैज्ञानिक कसोट्यांवर रत्नांची पारख केली जाते आणि ती सर्वात विश्वसनीय पद्धत आहे. मुंबईतील Gemmological institute of India या नामांकित संस्थेद्वारे Gemmology अर्थात रत्नशास्त्र या विषयावर अभ्यासक्रम तयार करून कोर्सेस शिकवले जातात .अनेक प्रकारच्या रत्नांची पारख कशी करावी याचे शास्त्रीय शिक्षण तेथे दिले जाते .आपल्या काटेकोर अभ्यासक्रम पद्धतीमुळे आज जगभरातून अनेक विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी येत असतात प्रस्तुत लेखकाने या संस्थेतून जेमॉलॉजी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे .रत्नांची जगभरातील वाढती मागणी आणि दुर्मिळता यामुळे रत्नांच्या बाजारपेठेत फसवणुकीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे .सामान्य ग्राहकांना रत्नांची पारख नसते त्याचा गैरफायदा काही लोक घेतात तर बऱ्याच वेळा स्वतः रत्नांची विक्री करणाऱ्यांस आपण कोणत्या प्रकारचे रत्न विकतो  आहोत याचे ज्ञान नसते. अनेक ठिकाणी खऱ्या रत्नां सारखे दिसणारे खोटे रत्न बनवण्याचे लघू उद्योग आहेत तर बऱ्याच वेळी काचेच्या तुकड्यांचा रंग देऊन पैलू पाडून त्यांची विक्री केली जाते. यामुळे रत्न खरेदी करताना सावधानता बाळगणे जरुरीचे असते पुढील लेखांमध्ये आपण विविध रत्नांची वैशिष्ट्ये उत्पत्ती स्थाने आणि त्यांची पारख कशी करावी याची माहिती घेऊया.

उज्ज्वल सुधाकर सराफ
 Gemmologists (रत्नतज्ञ)


Wednesday, February 26, 2020

चला रत्नांच्या दुनियेत!!! भाग १

रत्नांच्या दुनियेत

       
            (भारतातील रत्‍नसंपदा)


आदिम काळात मानव पृथ्वीवर जन्माला आला .हळूहळू स्वतःच्या गरजा आणि संरक्षणासाठी त्याने आपल्या बुद्धीचा वापर करून अन्न,  वस्त्र ,निवारा यांचा शोध घेतला .अगदी तेव्हापासूनच त्याची सौंदर्यदृष्टी जागृत होत गेली .त्याकाळी विविधरंगी दगडांच्या माळा घालून त्याने रत्नांच्या वापरायला सुरुवात केली. तेव्हा पासुन ते आजच्या माहिती तंत्रज्ञान युगापर्यंत माणसाला रत्नांविषयी अनामिक ओढ वाटते आहे. रत्नांचे आकर्षक रंग ,त्यांचं विलोभनीय तेज अनंत काळापर्यंतचे त्यांचे आयुष्य आणि दुर्मिळता यामुळे रत्नांना मूल्य प्राप्त झालं. आपल्या संस्कृतीत तर रत्नांच्या शुभाशुभ परिणामाविषयी थक्क करून टाकणारे दाखले सापडतात. म्हणूनच रत्नांच्या या अद्भुत दुनियेत जाताना अगोदर मागे वळून त्यांचा इतिहास पहायला पाहिजे .रामायण काळात मोठ्या प्रमाणात रत्ने सापडत होती असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आढळतो. समुद्रकिनारी मोती आणि प्रवाळांच्या राशीच्या राशी पडलेल्या असत. मंदिर आणि राजवाड्यांचे खांब रत्नजडित असत. तुलसीदास रचित श्रीरामचरितमानस मध्ये प्रभू रामचंद्रांच्या बालपणाचे वर्णन करताना ते म्हणतात ,बालरामाला रत्नजडित कटी सूत्र होते. रामाचा रंगदेखील नीलम रत्न प्रमाणे श्यामल होता .महाभारत कालीन मयासुर हा फार मोठा रत्नपारखी होता. तो आपल्या शिल्पकृतीत रत्नांचा वापर करत असे. खांडववन दग्ध करण्याच्या वेळेस अर्जुनाने मयासुरला जीवदान दिले .त्या उपकाराची परतफेड म्हणून मयासुराने पांडवांना रत्नजडित राजवाडा बांधून दिला .त्याचे नाव मयसभा .त्या मयसभेच्या मध्यभागी एक तळे तयार केले होते. त्या तळ्यातील कमळे रत्नां पासून तयार केली होती. कमळांची पाने वैडूर्य रत्नां पासून तयार केली आणि फुले माणकां पासून बनवलेली होती .तळ्याच्या पायऱ्या वेगवेगळ्या स्फटिक रत्नां पासून तयार केल्या होत्या. ही मयसभा व त्यातील हे तळे आभास निर्माण करणारे होते .त्यामुळे या मयसभेत दुर्योधनाची मोठी फजिती झाली होती. आणि त्याला द्रौपदी हसली होती .दुर्योधनाच्या या अपमान प्रसंगा पासून कौरव-पांडवातील द्वेशाग्नी भडकत गेला आणि त्याचे पर्यावसान महाभारत युद्धात झाले.

महाभारत काळात रत्ने वस्तुविनिमया साठी देखील वापरली जात. चलना प्रमाणे  त्यांचा उपयोग होत असे. रत्नांच्या माध्यमातून राजे लोक एकमेकास नजराणे अथवा खंडणी देत असत. जरासंधाच्या मृत्यूनंतर त्याच्या कैदेतील राजांनी भीम आणि श्रीकृष्णाला मौल्यवान रत्ने भेट म्हणून दिलीत .राजसूय यज्ञाच्या दिग्विजय मोहिमेत अनेक राजांनी पांडवांना रत्नांच्या रूपाने खंडणी दिली. पूर्वेकडील दिग्विजयात भिमाला म्लेंछांकडून मोती ,स्फटिक आणि पोवळ्या च्या रूपात खंडणी मिळाली असा उल्लेख सापडतो. कौरवांशी खेळलेल्या द्युतात धर्मराजाने सर्वप्रथम आपल्या गळ्यातील माणिक रत्नाचा हार पणास लावला होता. रामायण-महाभारत काळ हा भारताचा सुवर्णकाळ होता. म्हणून या काळात रत्ने आणि सुवर्ण विपुल प्रमाणात उपलब्ध होते असे कोणी म्हणेल .परंतू चीनी यात्रीक ह्यु -एन-त्संग भारतात आल्यावर त्याने त्याच्या रोजनिशीत तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे जे वर्णन केले आहे त्यात रत्न विषयक माहिती मिळते .ह्यू-एन-संग म्हणतो राजे लोक ज्या सिंहासनावर बसत ते वेगवेगळ्या रत्नांनी विभूषित असत. त्या सिंहासनाला मोत्यांच्या झालरी लावलेल्या असत. राजे लोक पाय ठेवण्यासाठी जे पदपीठ वापरीत तेसुद्धा रत्न मंडीत असे. प्राचीन भारतात विपुल रत्नसंपदा होती म्हणूनच चीनी यात्रीका ने  असे वर्णन केले हे सिद्ध होते .या रत्न आणि सुवर्णाच्या आमिषाने भारतावर आक्रमणे होऊ लागली .लुटीच्या हेतूने भारतावर पहिली स्वारी निनेवीची राणी सेमिरामिस ने केली .ही सर्वांची इ.पू.पूर्व 234 वर्ष केल्याने तिने किती संपत्ती लुटून नेली याची माहिती मिळत नाही .त्यानंतर अलेक्झांडरने पंजाब आणि सिंधचा समृद्ध प्रदेश लुटून नेला. या दोन आक्रमकांनी किती लुट नेली याची नोंद इतिहासात नाही. मात्र नंतरच्या आक्रमकांनी नेलेल्या लूटींची आकडेवारी उपलब्ध आहे .
महंमद गझनीने नगरकोटच्या देवस्थाना वरील चौथ्या स्वारीत २० मण  हिरे-मोती ,७ लक्ष सोन्याचे दिनार. 200 मण सोन्याच्या लगडी, ७०० मण सोन्याचे दागिने व 2000 मण चांदी लुटून नेली .याच गझनीने भिमनगर किल्ल्यातील आठव्या स्वारीत 90 फूट लांब 45 फूट रुंदीचे एक चांदीचे देवघर लुटून नेले ,शेवटची स्वारी त्याने सोरटीसोमनाथ वर केली.त्यात त्याने मंदिरातील मौल्यवान हिरे ,माणिक, मोती, नीलम, सोने आणि चांदी या सर्वांची लूट करून नेली .गझनीनेने आपल्या सोट्याने सोमनाथा ची मूर्ती फोडल्यावर त्यातून हिरे माणकांचा जमिनीवर ढीग पडला. ही यादी बरीच मोठी आहे .महंमद गझनीने नेलेल्या लुटीचे मूल्य त्या काळात तीस कोटी रुपये होते .यावरून आपल्याला त्या काळातील भारताच्या समृद्धीची कल्पना येईल. देशात सोन्याचा धूर निघत असे जे वर्णन आपण कथा कादंबर्‍यात वाचतो ते शब्दशहा खरे होते असे या माहितीवरून वाटते.

गझनीच्या महंमदा नंतर अलाउद्दीन खिलजीने आक्रमण केले, रामेश्वरच्या लूटीत त्याने हजारो हिरे-मोती माणिक आणि 96 हजार मण सोने नेले. विजयनगर राज्यात हिऱ्यांच्या अनेक खाणी होत्या .25 कॅरेट पेक्षा जास्त वजनाचा हिरा खाणीत सापडल्यास तो राजालाच दिला पाहिजे असा दंडक होता. तालिकोट च्या लढाईत विजयनगरचा रामराजा पालखीतून सैनिकांना उत्तेजन देत होता ,ती पालखी रत्नांनी मढवीलेली होती. या युद्धात पराक्रम गाजवलेल्या सैनिकांना रामराजा ओंजळी भरभरून हिरे-मोती आणि पाचू इनाम म्हणून देत होता. रामायण महाभारत कालीन रत्न संपदेला शास्त्रीय पुरावे आज उपलब्ध नाहीत म्हणून कोणी त्यावर कल्पित वर्णन म्हणून शेरा देईल. परंतु बाराव्या शतकानंतर च्या लुटीची वर्णने ही पुराव्यानिशी सिद्ध झाली आहेत. केवळ हिंदूंच्या असंघटितपणामुळे हजारो किलोमीटरवरून परकीय आक्रमक आले आणि त्यांनी आपला संपन्न देश लुटून नेला. आज तरी आपण यावरून काही धडा घेणार आहोत का ??  इतिहास हा भविष्यकाळासाठी वर्तमानकाळाला मार्गदर्शक असतो .इतिहासातील चुकांची जे पुनरावृत्ती करतात त्यांच्या कपाळी पुन्हा तोच इतिहास लिहिला जातो.


सुरुवातीला आक्रमण करणारे मुगल आक्रमक नंतर देशावर राज्य करू लागले .शहाजहान बादशहाच्या राज्यारोहण प्रसंगी त्याने एक अंबर रत्नाचा दिवा तयार केला होता या दिव्यात त्याने मोठा गोवळकोंडी  हिरा बसवला होता .हा अठरा शेर वजनाचा दिवापुढे मक्केस पाठविण्यात आला. शहाजहानने स्वतःसाठी सात सिंहासने तयार केली होती. ती सर्व माणिक ,पाचू ,नीलम ,पुष्कराज ,मोती आणि हिरे यांनी सजविली होती असे वर्णन फ्रेंच प्रवासी टेव्हरनिअर यांनी केले आहे. १६५५ते १६६७ या काळात  फ्रेंच प्रवासी बर्नियर हा मोगलांचा राजवैद्य होता .त्याने आपल्या ग्रंथात मयुरासन आणि बादशहा रोज धारण करीत असलेल्या अलंकारांची तसेच मोगलांच्या खजिन्यात हिरे मोत्यांच्या राशी होत्या अशी वर्णने केली आहेत.

मोगल सम्राटांच्या अस्तानंतर महाराष्ट्रात पेशवाईचा उदय झाला. पेशव्यांकडे देखील प्रचंड रत्न संपदा होती .ति ते ब्राह्मणांना दान करीत असत असे उल्लेख जागोजागी सापडतात. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहधर्मचारिणी श्रीमंत रमाबाई साहेब सती गेल्या त्यावेळी त्यांनी आपल्या हातातील हिरेजडीत बांगड्या दान केल्या. पेशवाई धोक्यात असताना पेशव्यांनी आपल्या खजिन्यातील मौल्यवान रत्ने नेपाळ नरेशाला विकली .त्यातील काही रत्ने आजही नेपाळच्या राजघराण्याकडे आहेत. पेशवाई बुडाल्यानंतर इंग्रजांचा अंमल सुरु झाला .त्यांनीदेखील सर्व संस्थाने खालसा केली .संस्थानिकांकडे असलेली मौल्यवान रत्ने इंग्लंडला नेली.  पंजाबच्या महाराजा दिलीप सिंग कडून नेलेला जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा आजही लंडनमध्ये व्हिक्टोरिया राणीच्या मुकुटात पाहायला मिळतो. हजारो वर्षांपासूनचा हा रत्नांचा इतिहास भारतीयांना रत्नांविषयी किती ओढ आहे आणि रत्नांच्या धारण करण्याने काय फायदे होतात याची माहिती ज्योतिषी तज्ञांना किती सखोलपणे होती हेच दर्शवितो .आज देखील आपल्या देशात रत्नां पासून मिळणाऱ्या फायद्यांसाठी लाखो लोक विविध रत्ने आपल्या बोटात धारण करीत असतात.



भयंकराशी भेट

भयंकराशी भेट दिनांक २४ ऑगस्ट २०२० च्या सकाळी मोबाईलची रिंग वाजली तेव्हा कल्पनाही नव्हती की ही एक भयप्रद घंटा आहे . माझ्या अगदी ज...