सुवर्णमुद्रा विश्वासाची....भाग-१
भुसावळात रेल्वे आली म्हणून माझे खापरपणजोबा नथ्थूशेठ सखाराम शेठ नवगाळे हे सन १८९० च्या सुमारास भुसावळात स्थायिक झाले. ते सावकारी करीत असत. शेतजमीन आणि सोन्याचांदीचे दागिने गहाण ठेवून कर्ज देणे हा त्यांचा व्यवसाय पुढच्या पिढ्यांनी परंपरेने स्वीकारला आणि तो सराफी पेढीत रूपांतरित झाला. या १२५ वर्षांच्या परंपरेत असंख्य अनुभवांची मांदियाळी माझ्या वडिलांकडे जमा आहे.
साधारण तीस चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट ! एक दिवस एक विधवा म्हातारी दुकानात आली आणि करूण चेहऱ्याने वडीलांना सांगू लागली काय करू शेठ, माझा मुलगा खूप दारू पितो, रोज माझ्याकडे पैसे मागतो, नाही दिले तर हिसकावून घेतो, हात उगारायलाही कमी करत नाही. थोडाफार पैसा आहे माझ्याकडे पण तोही मुलाच्या व्यसनात संपून जाईल. तिच्या व्यथेवर काय उपाय? पोस्टात पैसे ठेवले तर व्यसनी मुलगा पासबुक बघून पैसे मागतो. म्हातारीची चिंता अगदी खरी होती. यावर वडिलांनी एक अफलातून उपाय सांगितला. सोन्याच्या चार बांगड्या बनवुन घ्या! अहो पण पोरगा त्या दुसऱ्याच दिवशी हिसकावून घेईल ना! म्हातारी म्हणाली, वडिलांनी सांगितले की बांगड्या सोन्याच्याच करू त्यावर चांदीचा पत्रा लावून देतो. दिसायला त्या चांदीच्या दिसतील. म्हातारीला आयडीया एकदम पटली. तीस-चाळीस वर्षांपूर्वी चांदीची किंमत नगण्य होती. बरीच वर्षे ती म्हातारी हातात चार चांदीच्या बांगड्या घालून वावरली. दुकानात आली की बांगड्यां कडे बघून खुदुखुदु हसायची.
१९६३ साली पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते आणि मोरारजी देसाई अर्थमंत्री होते .तेव्हा सुवर्ण नियंत्रण कायदा लागू करण्यात आला. शुद्ध सोनं विकायला बंदी करण्यात आली. सोन्याच्या शुद्धतेसाठीच नावारूपाला आलेली आमची पेढी या अवचित संकटाने हादरून गेली. शुद्ध सोनं विकायचं नाही, १४कॅरेटच विकायचं, काहीतरी विपरीत ! मोठ्या विश्वासाने मध्यमवर्गीय आणि खेडूत लोक शुद्ध सोनं घेण्यासाठी माझ्याकडे येतात, त्यांना काय १४ कॅरेटच सोनं देऊ? अशक्य!! त्यापेक्षा मी दुकान बंद करून शेती करीन. आणि या तत्त्वासाठी वडीलांनी चक्क दोन वर्षे दुकानाला कुलूप लावलं ,नुकसान सहन केलं पण १४ कॅरेटचं लाल सोनं नाही विकलं. दोन वर्षांनी कायद्याची बंधने सैल झाली तेव्हा दुकानाचं कुलूप निघालं. ग्राहकवर्ग पुन्हा परतून विश्वासाने खरेदी करू लागला.
जेव्हा मी दुकानात प्रथमच सीसीटीव्ही कॅमेरे लावले तेव्हा एक ग्राहक मला म्हणाले चला बरं झालं या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आता चोरांना चांगला वचक बसेल. हे कॅमेरे चोरी पकडण्यासाठी लावले आहेत हे खरय, पण चोर त्यांना घाबरत नाहीत. मात्र एखाद्या माणसाला काउंटरवर आमच्या नजरचुकीने राहून गेलेली वस्तू उचलण्याचा मोह झाला तर अशा प्रोफेशनल चोर नसणाऱ्या पण मोहवशात चोरी करणाऱ्या लोकांवर मानसिक दबाव ठेवण्याचं काम तो कॅमेरा उत्तमपणे करतो . सराफी दुकानांमध्ये काऊंटर वरून वस्तू जाण्याचे प्रकार कधीकधी होतातच. आम्ही लोक अखंड सावधान असतो विशेषतः बुरखे वाल्या बायां पासून फार सावधानता बाळगावी लागते. मागे एका सराफ असोसिएशनने तर दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी बुरखे काढावेत असा प्रस्ताव ठेवला होता पण धार्मिक भावना दुखावतील म्हणून तो मागे घ्यावा लागला.
ग्राहकांकडून दागिन्यांची मोड घेणं हा तसा माझा मन खंतावणारा प्रकार आहे. अगदी नव्वद टक्के ग्राहक सोन्याच्या दागिन्यांची मोड करतो तेव्हा त्याच्याकडे आर्थिक अडचण असते .आजारपण असतं. कर्जाचे हप्ते थकले असतात. शेतकरी असेल तर शेती हा आतबट्याचा व्यवसाय झाल्याने तो बिचारा त्रस्त झालेला असतो. ग्राहकाला पैशाची खूप निकड असते आणि घाई पण असते. अशावेळी कायदा आडवा येतो. नवीन कायद्याप्रमाणे दहा हजार रुपयांच्या वरची मोड घेताना रोख रक्कम देता येत नाही, चेक द्यावा लागतो. अशा वेळी आम्ही कात्रीत सापडतो .ग्राहक रोख रकमेसाठी अजीजी करतो आणि कायदा आमचे हात बांधतो.
विधवा स्त्रीच्या मंगळसूत्राची मोड घेणं हा तर अत्यंत वेदनादायी अनुभव असतो. मंगळसूत्र हा स्त्रियांसाठी केवळ एक दागिना नाही तर त्याहूनही खूप अधिक जिवाभावाची वस्तू असते. मंगळसूत्र मोडीला देताना त्या विधवा स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जातात. मध्यंतरी माझ्याशी जवळून परिचय असणाऱ्या एका मध्यमवयीन ग्राहकाचंअकाली निधन झालं .त्यांच्या पत्नीने मंगळसूत्र मोडून आता चेन द्या, असं म्हटलं तेव्हा तर मी शहारून गेलो . त्या मंगळसूत्राचे काळे मणी फोडण्यासाठी हातोडीचे घाव घातले जात होते जणू काही ते माझ्या हृदयावरच होत होते.
जळगाव -भुसावळचा सराफी कट्टा हा उत्तम दर्जाच्या सोन्यासाठी विख्यात आहे. त्यासाठी अगदी दूरदूरवरून ग्राहक सोने खरेदीसाठी येतात. भुसावळात काही वर्ष राहून नंतर दुसऱ्या गावी गेलेले असंख्य ग्राहक असे आहेत की जे आवर्जून सोनं खरेदीसाठी आमच्या पेढीत येतात. वृद्धत्वामुळे हिंडायला फिरायला त्रास होत असतो ,तरीदेखील दूरवरचा प्रवास करून जेव्हा ग्राहक मोठ्या विश्वासाने दुकानात येतात तेव्हा अगदी भरून येतं आणि "पैसा कमवीण्यापेक्षा विश्वास कमवीणं जास्त महत्त्वाचे आहे " ही वडीलांची शिकवण अधोरेखित होते ,म्हणूनच विश्वासाची सुवर्णमुद्रा ग्राहकांच्या मनावर कोरणं हे जास्त महत्त्वाचे आहे असं मला वाटतं.
(क्रमशः)
उज्ज्वल सुधाकर सराफ
Gemmologist (रत्नतज्ज्ञ)
हे देखील अवश्य वाचा