Thursday, April 30, 2020

सुवर्णमुद्रा विश्वासाची....भाग- १

सुवर्णमुद्रा विश्वासाची....भाग-१


भुसावळात रेल्वे आली म्हणून माझे खापरपणजोबा नथ्थूशेठ सखाराम शेठ नवगाळे हे सन १८९० च्या सुमारास भुसावळात स्थायिक झाले. ते सावकारी करीत असत. शेतजमीन आणि सोन्याचांदीचे दागिने गहाण ठेवून कर्ज देणे हा त्यांचा व्यवसाय पुढच्या पिढ्यांनी परंपरेने स्वीकारला आणि तो सराफी पेढीत रूपांतरित झाला. या १२५ वर्षांच्या परंपरेत असंख्य अनुभवांची मांदियाळी माझ्या वडिलांकडे जमा आहे.

साधारण तीस चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट ! एक दिवस एक विधवा म्हातारी दुकानात आली आणि करूण चेहऱ्याने वडीलांना सांगू लागली काय करू शेठ, माझा मुलगा खूप दारू पितो, रोज माझ्याकडे पैसे मागतो, नाही दिले तर हिसकावून घेतो, हात उगारायलाही कमी करत नाही. थोडाफार पैसा आहे माझ्याकडे पण तोही मुलाच्या व्यसनात संपून जाईल. तिच्या व्यथेवर काय उपाय? पोस्टात पैसे ठेवले तर व्यसनी मुलगा पासबुक बघून पैसे मागतो. म्हातारीची चिंता अगदी खरी होती. यावर वडिलांनी एक अफलातून उपाय सांगितला. सोन्याच्या चार बांगड्या बनवुन घ्या! अहो पण पोरगा त्या दुसऱ्याच दिवशी हिसकावून घेईल ना! म्हातारी म्हणाली, वडिलांनी सांगितले की बांगड्या सोन्याच्याच करू त्यावर चांदीचा पत्रा लावून देतो. दिसायला त्या चांदीच्या दिसतील. म्हातारीला आयडीया एकदम पटली. तीस-चाळीस वर्षांपूर्वी चांदीची किंमत नगण्य होती. बरीच वर्षे ती म्हातारी हातात चार चांदीच्या बांगड्या घालून वावरली. दुकानात आली की बांगड्यां कडे बघून खुदुखुदु हसायची.

१९६३ साली पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते आणि मोरारजी देसाई अर्थमंत्री होते .तेव्हा सुवर्ण नियंत्रण कायदा लागू करण्यात आला. शुद्ध सोनं विकायला बंदी करण्यात आली. सोन्याच्या शुद्धतेसाठीच नावारूपाला आलेली आमची पेढी या अवचित संकटाने हादरून गेली. शुद्ध सोनं विकायचं नाही, १४कॅरेटच विकायचं, काहीतरी विपरीत ! मोठ्या विश्वासाने मध्यमवर्गीय आणि खेडूत लोक शुद्ध सोनं घेण्यासाठी माझ्याकडे येतात, त्यांना काय १४ कॅरेटच सोनं देऊ? अशक्य!! त्यापेक्षा मी दुकान बंद करून शेती करीन. आणि या तत्त्वासाठी वडीलांनी चक्क दोन वर्षे दुकानाला कुलूप लावलं ,नुकसान सहन केलं पण १४ कॅरेटचं लाल सोनं नाही विकलं. दोन वर्षांनी कायद्याची बंधने सैल झाली तेव्हा दुकानाचं कुलूप निघालं. ग्राहकवर्ग पुन्हा परतून विश्वासाने खरेदी करू लागला.


जेव्हा मी दुकानात प्रथमच सीसीटीव्ही कॅमेरे लावले तेव्हा एक ग्राहक मला म्हणाले चला बरं झालं या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आता चोरांना चांगला वचक बसेल. हे कॅमेरे चोरी पकडण्यासाठी लावले आहेत हे खरय, पण चोर त्यांना घाबरत नाहीत. मात्र एखाद्या माणसाला काउंटरवर आमच्या नजरचुकीने राहून गेलेली वस्तू उचलण्याचा मोह झाला तर अशा प्रोफेशनल चोर नसणाऱ्या पण मोहवशात  चोरी करणाऱ्या लोकांवर मानसिक दबाव ठेवण्याचं काम तो कॅमेरा उत्तमपणे करतो . सराफी दुकानांमध्ये काऊंटर वरून वस्तू जाण्याचे प्रकार कधीकधी होतातच. आम्ही लोक अखंड सावधान असतो विशेषतः बुरखे वाल्या बायां पासून फार सावधानता बाळगावी लागते. मागे एका सराफ असोसिएशनने तर दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी बुरखे काढावेत असा प्रस्ताव ठेवला होता पण धार्मिक भावना दुखावतील म्हणून तो मागे घ्यावा लागला.

ग्राहकांकडून दागिन्यांची मोड घेणं हा तसा माझा मन खंतावणारा प्रकार आहे. अगदी नव्वद टक्के ग्राहक सोन्याच्या दागिन्यांची मोड करतो तेव्हा त्याच्याकडे आर्थिक अडचण असते .आजारपण असतं. कर्जाचे हप्ते थकले असतात. शेतकरी असेल तर शेती हा  आतबट्याचा व्यवसाय झाल्याने तो बिचारा त्रस्त झालेला असतो. ग्राहकाला पैशाची खूप निकड असते आणि घाई पण असते. अशावेळी कायदा आडवा येतो. नवीन कायद्याप्रमाणे दहा हजार रुपयांच्या वरची मोड घेताना रोख रक्कम देता येत नाही, चेक द्यावा लागतो. अशा वेळी आम्ही कात्रीत सापडतो .ग्राहक रोख रकमेसाठी अजीजी करतो आणि कायदा आमचे हात बांधतो.

विधवा स्त्रीच्या मंगळसूत्राची मोड घेणं हा तर अत्यंत वेदनादायी अनुभव असतो. मंगळसूत्र हा  स्त्रियांसाठी केवळ एक दागिना नाही तर त्याहूनही खूप अधिक जिवाभावाची वस्तू असते. मंगळसूत्र मोडीला देताना त्या विधवा स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जातात. मध्यंतरी माझ्याशी जवळून परिचय असणाऱ्या एका मध्यमवयीन ग्राहकाचंअकाली निधन झालं .त्यांच्या पत्नीने मंगळसूत्र मोडून आता चेन द्या, असं म्हटलं तेव्हा तर मी शहारून गेलो . त्या मंगळसूत्राचे काळे मणी फोडण्यासाठी हातोडीचे घाव घातले जात होते जणू काही ते माझ्या हृदयावरच होत होते.

जळगाव -भुसावळचा सराफी कट्टा हा उत्तम दर्जाच्या सोन्यासाठी विख्यात आहे. त्यासाठी अगदी दूरदूरवरून ग्राहक सोने खरेदीसाठी येतात. भुसावळात काही वर्ष राहून नंतर दुसऱ्या गावी गेलेले असंख्य ग्राहक असे आहेत की जे आवर्जून सोनं खरेदीसाठी आमच्या पेढीत येतात. वृद्धत्वामुळे हिंडायला फिरायला त्रास होत असतो  ,तरीदेखील दूरवरचा प्रवास करून जेव्हा ग्राहक मोठ्या विश्वासाने दुकानात येतात तेव्हा अगदी भरून येतं आणि "पैसा कमवीण्यापेक्षा विश्वास कमवीणं जास्त महत्त्वाचे आहे " ही वडीलांची शिकवण अधोरेखित होते ,म्हणूनच विश्‍वासाची सुवर्णमुद्रा ग्राहकांच्या मनावर कोरणं हे जास्त महत्त्वाचे आहे असं मला वाटतं.
(क्रमशः)



उज्ज्वल सुधाकर सराफ
Gemmologist (रत्नतज्ज्ञ)

हे देखील अवश्य वाचा







Monday, April 6, 2020

सौंदर्याधिपती मोती : चला रत्नांच्या दुनियेत लेख क्र.५

"सौंदर्याधिपती मोती"   (चला रत्नांच्या दुनियेत या लेखमालेतील लेख क्र.५)

स्वाती नक्षत्रात झरणाऱ्या पावसाचा थेंब जर समुद्रातल्या शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो. हि कवीकल्पना आपल्याकडे जनमानसात रूढ आहे. अर्थात वास्तविकता तशी नाही. कवीकल्पनाच ती,  "जे न देखे रवि ते देखे कवी" पण या कवी कल्पनेत देखील एक गर्भित अर्थ आहे.तो असा की, स्वाती नक्षत्र हे साधारणतः ऑक्टोबर महिन्यात येते .भारतीय उपखंडात यावेळी पाऊस सहसा पडत नाही. तरीदेखील या नक्षत्रात पाऊस पडलाच आणि समुद्रात तरंगणाऱ्या शिँपल्यात पावसाचा थेंब गेला . इथेपण दुर्मिळता अशी की शिंपले हे समुद्रतळाशीच राहतात ते पृष्ठभागावर सहसा येत नाहीत .तरी पण जर ते पृष्ठभागावर आले ,त्यावेळी स्वाती नक्षत्र असले, आणि नेमका पाऊस पडलाच आणि त्यातही शिंपल्याचे तोंड उघडे असले ( ते बहुधा बंदच असते) आणि त्यात पावसाचा थेंब शीरला  तर त्याचा मोती होतो. अर्थात इतक्या नियम अटी जर-तरच्या भिंती पार करून मोती तयार होतो. म्हणजे तो किती किती दुर्मिळ असावा हे कवीला त्या " स्वाती नक्षत्राच्या पावसाने मोती बनतात" यातून सांगायचं आहे. असे लाखो शिंपले गोळा करून त्यातल्या एखाद्यात मोती सापडतो. लाखात एक देखणी!  तसला हा प्रकार. मग ते मोती राजा विकत घेणार, त्याचा कंठा गळ्यात धारण करणारा, म्हणजे किती मौल्यवान तो मोत्याचा कंठा !!
 आणि मग राजाच्या कानावर एखादी गोड बातमी आली तर खुश होऊन राजा तो मोत्याचा कंठा ती गोड बातमी सांगणाऱ्या दासीला खुश होऊन देऊन टाकणार ,अशा कथा आपल्याला पौराणिक साहित्यात जागोजागी सापडतात.

टपोरा गोल पांढराशुभ्र आणि चमकदार मोत्याचं आकर्षण आपल्याकडे पूर्वापार आहे. अशा या मोत्याची जन्मकथा काय आहे?   निळाईची दुलई घेऊन अथांग पसरलेल्या सागराच्या पोटात अद्भुत जीवसृष्टी नांदते आहे. यात अनेक प्रकारचे प्रवाळ, शंख, शिंपले हे जीव देखील राहतात. या शिंपल्यात पिंक्टोडा जातीचे जे शिंपले( कालव) असतात ते नैसर्गिक मोती बनवतात. या शिंपल्यांची रचना आपल्या सुटकेस सारखी असते. त्यांचं तोंड अधून-मधून उघडत आणि त्यावेळी जर एखादा टणक बाह्यपदार्थ त्या शिंपल्यात शिरला तर त्या शिंपल्यात राहणाऱ्या मांसल कालवाला तो कण टोचू लागतो. मग त्याच्या पेशी त्या कणावर शुगर कोटेड गोळीसारखं नेकर नामक पांढऱ्या स्त्रावाचं आवरण चढवतात. ही प्रक्रिया २/४वर्षे किंवा त्याहून अधिक काळ चालू राहू शकते. आणि त्यातूनच नैसर्गिक मोत्याची (sea water pearl)निर्मिती होते.

श्रीलंकेत मनारच्या आखातात असे नैसर्गिक मोती बनत असत. पण पार्शियाच्या आखातात बनणारे इराणच्या बसरा नामक ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बंदरातील मोती जगप्रसिद्ध  आहेत. आजही नैसर्गिक मोत्यांसाठी बसरा मोती हाच शब्द रुढ आहे. वास्तविक युद्धजन्य परिस्थितीमुळे आता बसऱ्या हून मोती येणं बंदच झालंय. त्याऐवजी दक्षिण अमेरिकेतल्या वेनेजुएला देशातून नैसर्गिक मोती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येतात. २०१७ साली इथे नोटबंदी झाली. त्यावर जनक्षोभ उसळला वेनेजुएलाची घसरणीला लागलेली अर्थव्यवस्था या नोटबंदी मुळे साफ कोलमडली. (मोदींची कॉपी करायला गेले आणि तोंडावर आपटले) तेव्हापासून वेनेजुएलन मोत्याचं दर्शनही दुर्लभ झाल आहे.

दुर्मिळात दुर्मिळ असणाऱ्या या नैसर्गिक मोत्यांवर जपानने एक नामी इलाज शोधून काढला. तो म्हणजे संश्लेषित (cultured )मोत्यांचा.  हा मोती देखील शिंपल्यातच बनतो.फक्त या मोत्यात बाह्यकण आत जाण्याची वाट न पाहता शिंपल्याचे तोंड उघडून त्यात तो घुसवला जातो. पुढची प्रक्रिया निसर्गनियमाप्रमाणे होते आणि मोती जन्मतो. एक प्रकारे ही मोत्यांची शेतीच असते .पाण्यात जाळी लावून जपान आणि नंतर चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आणि आता भारतातही काही प्रमाणात मोत्यांची शेती होते. या शेतीमुळे मोत्यांची दुर्मिळता संपली. आणि अक्षरश: पोत्याने मोत्यांची पैदास होऊ लागली. आज या कल्चर्ड मोत्यांनी सगळी बाजारपेठ ताब्यात घेतली आहे .नैसर्गिक मोत्यांपेक्षा स्वस्त मस्त आणि टिकाऊ व चमकदार असलेले हे मोती fresh water  pearl म्हणून ओळखले जातात. हैदराबाद येथे या मोत्यांची ड्रिलिंग इंडस्ट्री उभी राहिली आहे. चीनमधून हे मोती आयात करून त्यांना छिद्र पाडण्याचं काम हैदराबादेत मोठ्या प्रमाणात चालतं. त्यामुळे आपल्याकडे हैदराबादी मोती असं नाव कल्चर्ड मोत्यांसाठी रूढ झालय. कल्चर्ड मोत्यांमधे अलीकडे चक्क चौकोनी( cube) आकाराचे मोतीही मिळू लागले आहेत. विविध रंगांचे हव्या त्या आकाराचे मोती सहज उपलब्ध होतात. मोत्यांचा एक सारखा आकार आणि त्याची चमक यावरून मोत्याची प्रत व कींमत ठरवली जाते.गोल आणि एक सारख्या आकारांचे मोती कीमतीला थोडे महाग मिळतात. मात्र वेडावाकडा आकार असेल तरच मोती खराअसतो असा चुकीचा समज जनमानसात आहे.

कल्चर्ड मोत्यां व्यतिरिक्त प्लास्टिक /फायबर दाण्यांवर रसायनांचा थर देऊनही सेमीकल्चर मोती मोठ्या प्रमाणात तयार होतात. खर्‍या मोत्यांपेक्षा हे मोती आकर्षक आणि चमकदार दिसतात. त्यामुळे दागिन्यांमध्ये याच मोत्यांना मागणी अधिक असते .तन्मणी, चिंचपेटी ,मोत्यांचे कुडे,लफ्फा, नथ अशा विविध महाराष्ट्रीय मोत्यांच्या दागिन्यांची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे .महिलांचे सौंदर्य खुलवण्याचे काम मोती करतो. कारण त्यात एक प्रकारचा सोज्वळ घरंदाजपणा आहे. मोत्यांचे मोहक दागिने सौंदर्यवतींच्या सौंदर्याला शतगुणित करतात. म्हणून तर मोत्याला सौंदर्याधीपती मोती म्हटलं आहे.

ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मोती हा चंद्राचे प्रतिनिधित्व करतो. चंद्राप्रमाणे शुभ्रधवल, तेजस्वी शांत प्रवृत्तीचा !!  चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणून मनाशी संबंधित सर्व कारणांसाठी मोती वापरण्याचा सल्ला ज्योतिषी देत असतात. मन एकाग्र करणे, रागीट स्वभाव शांत करणे, मनाची अस्थिरता, चंचलता नाहीशी करणे. या कारणांसाठी मोती चांदीच्या अंगठीत करंगळीत अथवा अनामिकेत धारण केला जातो. माणसाने आपल्या मनावर ताबा मिळवीला म्हणजे त्याला सर्व सुखं प्राप्त होतात असं सांगितलं जातं. म्हणूनच तर बहुसंख्य लोक सुखाच्या शोधार्थ मोती वापरतात.

उज्ज्वल सुधाकर सराफ
रत्नतज्ज्ञ (Gemmologist)

भयंकराशी भेट

भयंकराशी भेट दिनांक २४ ऑगस्ट २०२० च्या सकाळी मोबाईलची रिंग वाजली तेव्हा कल्पनाही नव्हती की ही एक भयप्रद घंटा आहे . माझ्या अगदी ज...